जामखेड न्युज——
नगर आणि बीड जिल्ह्यातील वाळू माफियांच्या दोन गटात राडा, सहा जण जखमी मोटारसायकलीही जाळल्या

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बोरगाव परिसरात रात्री अचानक नगर आणि बीड जिल्ह्यातील वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाला यात सहा जण जखमी झाले असून मोटारसायकलीही जाळल्या आहेत. जाधव आणि ढाकणे गटात वाळूच्या कारणावरून तूफान राडा झाल्याची घटना (25 मे ) रोजी रात्री घडली असून या घटनेत सहाजन गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर बीड व संभाजी नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चकलांबा पोलिस ठाणे अंतर्गत बोरगाव बु. परिसरात गोदापात्र आहे. बोरगाव हे गेवराई तालुक्याच्या हद्दीत आहे. पलीकडे नगर जिल्हा आहे. नेहमीच मुंगी येथील वाळू माफिया या परिसरात दहशत माजवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

परंतु, याबाबत कधी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वाळू उपसावरून गावातील जाधव आणि मंगी येथील ढाकणे गटात वर्चस्ववादातून तूफान हाणामारी झाली. तसेच या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच रोडवर मोटार सायकलही जाळण्यात आल्या आहेत. अद्याप तरी या प्रकरणी चकलांबा
पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता अशी माहिती समोर आली आहे.

कारवाईचा देखावा ?
गोदावरी नदी काठ तसेच गेवराई तालुका हा वाळू प्रकरणी अधिकच चर्चेत आहे. गोदावरी पात्रातून रोज हजारो ब्रास वाळू उपसा होतोय, हे सर्वश्रुत असताना प्रशासन मात्र महिना, पंधरा दिवसांत एखादी कारवाई करून देखावा करत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. नदीत पाणी असले तरी केनीच्या सहाय्याने वाळू उपसा होतो, हे सर्व स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना माहित होत नाही का ? हे साहेब करतात तरी काय ? , त्यांचेच या वाळू माफियांना पाठबळ तर नाही ना ? असे प्रश्न उपस्थित होत असून या अवैध वाळू उपशाबाबत प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.


