जामखेड न्युज——
साठ वर्षाच्या शिक्षकानं वीस वर्षाच्या मुलीशी प्रेमविवाह! बारामती तालुक्यातील घटना
“हे हृदय म्हणू की लेणे, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे…’ या जगदिश खेबुडकरांच्या काव्यपंक्तीचा अनुभव बारामती तालुक्यातील एका दाम्पत्याने घेतला. एकमेकावर असणाऱ्या अतुट विश्वासाच्या जोरावर आयुष्यात त्यांनी प्रेमाचे रंग भरले. या प्रेमाला डर नाही. उपमाही नाही. साठ वर्षाच्या शिक्षकानं वीस वर्षाच्या मुलीशी केला प्रेमविवाह!
माळेगावचे पोलीस ठाणे! या ठाण्यात सारेच गंभीर चेहऱ्याने बसलेले! विषय होता साठ वर्षाच्या सेवानिवृत्त शिक्षकानं त्याच शाळेतल्या वीस वर्षीय मुलीसोबत केलेला प्रेम विवाह! नातेवाईक, पोलीसही चक्रावलेले.. आधी समजावून पाहिलं.. मग सुनावून पाहिलं.. मग थोडा धाक दाखवला.. पण मुलीनंही आपल्या ज्येष्ठ असलेल्या पतीचीच बाजू घेतली आणि साऱ्यांनाच गप्प बसावं लागलं!
ही घटना आहे बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील! या गावात शाळेत शिकवणारा शिक्षक नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे. अशावेळी ज्या शाळेत आपण शिकवतो, त्या शाळेतील वीस वर्षीय मुलगी प्रेमात पडली आणि रितसर दोघांनी प्रेमविवाह केला.
प्रेमविवाह करण्यात गैर ते काय? कुणालाही हा प्रश्न पडेल, खरंतर प्रेमाला वय नसतं, पण समाजात म्हटलं जातं की, वयाचंही काही बंधन असतं.. वयाचं काही अंतरही असतं.! येथे मात्र या अंतराची ऐशीतैशी झालेली या प्रेमविवाहात पाहायला मिळाली.
अर्थात आता कायद्याने सज्ञान झालेली मुलगीच जर आपण प्रेमविवाह पूर्णपणे शुद्धीवर असताना, विचारपूर्वक केलेला आहे असं सांगत असेल, तर कायदा देखील त्याला काही करू शकत नाही. साहजिकच सध्या हा प्रेमविवाह चर्चेचा विषय ठरला आहे.