जामखेड न्युज——
बचाव पथकातील SDRF ची बोट उलटली! चार जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनेचा थरार
नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या SRDF पथकाची बोट उलटली आणि होत्याच नव्हतं झालं. धुळ्याहून आलेल्या SDRF च्या जवानांवर काळाने घाला घातला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदी पात्रात SDRF पथकाचे 5 जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले. पाण्यात भोवरा निर्माण होऊन SDRF पथकाची बोट पलटली अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आज आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) या पथकाच्या दोन बोटींपैकी एक बोट उलटली. तीमधील सहाजण बुडाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. इतर दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये प्रकाश शिंदे (वय ३५), वैभव वाघ (वय ४०), राहुल पावरा (वय २७, तिघे रा. धुळे) यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे, तर गणेश देशमुख (वय ३७, रा. सुगाव) हा बेपत्ता आहे. परंतु, तो खोल पाण्यात गेला असल्याने त्याचाही मृत्यू झाल्याचे बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात आलेल्यांमध्ये पंकज पवार (वय ३८) व अशोक पवार (दोघे रा. धुळे) यांचा समावेश आहे. दुसऱ्या बोटीत असलेले मनोज शिंपी व कमलेश महाजन (दोघे रा. धुळे) हे दोघेही जखमी आहेत. सर्वांवर अकोले येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काल (बुधवारी) दुपारी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर जेडगुले (वय २५, ता. सिन्नर) व अर्जुन जेडगुले (वय १८, ता. संगमनेर) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह काल सापडला. दुसऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आज धुळे येथील ‘एसडीआरएफ’च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील बोटही बुडाल्याने आजची दुर्घटना झाली.
बचाव पथक दोन बोटींद्वारे शोधकार्यासाठी पाण्यात शिरले होते. नदीपात्राच्या मध्यभागी गेल्यानंतर तेथे असलेल्या खड्ड्यांमुळे तयार झालेल्या भोवऱ्यात सहाजण असलेली बोट सापडली. त्यामुळे ते सर्वजण बुडू लागले. त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले.
घटनेबाबत माहिती देताना सुगाव गावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे म्हणाले की, नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी एसडीआरएफचे पथक गावात दाखल झाले. त्यांची शोधमोहिम साडेसहा वाजेच्या सुमारास सुरू झाली होती. एसडीआरएफ पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या. काही वेळाने एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने क्षणार्धात बोट उलटली. तर दुसरी बोट पाण्यात चकरा मारत होती. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही. तर दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच ते बुडाले, अशी माहिती त्यांनी दिली