जामखेड न्युज———-
नाम संकीर्तनामुळे लाभच लाभ मिळतो – हभप ज्ञानेश्वर महाराज पवने
साकतमधील सप्ताहामध्ये हभप ज्ञानेश्वर महाराज पवने यांची किर्तन सेवा संपन्न
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास आज हभप ज्ञानेश्वर महाराज पवने यांची किर्तन सेवा संपन्न झाली यात त्यांनी नाम संकीर्तनाच्या सुखकारक व्यवहाराविषयी सविस्तर माहिती सांगितली यावेळी गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग घेतला होता.
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥
संगती पंगती देवासवें घडे । नित्य नित्य तेंचि साच ॥ध्रु.॥
समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कथा कासयाची ॥२॥
तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥
अर्थ
नाम संकीर्तनाच्या सुखकारक व्यवहाराने इतक्या सुखाचा लाभ झाला आहे की मागे पुढे सर्व आनंदच दाटला आहे. आता आम्हाला देवा संगे आणि देवाच्या संगतीत त्याच्या पंक्तीत बसण्याचा योग घडतो आहे आणि हा लाभ मर्यादित काळा पुरता नसून नित्य नित्य म्हणजे रोज रोज लाभत आहे. देव सर्वसमर्थ आहे आणि त्याच्या घरी सर्व संपदा आहे त्यामुळे आम्हाला कशाचीही कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात समर्थांच्या घरी देवाच्या घरी कोट्यावधी लाभ होतात आणि समर्थांच्या पोटी मोठा वाव(जागा) आहे.
सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवतकथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, भागवतकथा हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. ३ पासून सुरू झाला आहे. व बुधवार दि. १० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल. आज सोमवार दि. ८ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज पवने जामखेड
उद्या मंगळवार दि. ९ रोजी गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ
बुधवार दि. १० रोजी हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.
सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप गणेश महाराज काळवणे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, ३ ते ५.३० भागवतकथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन नंतर गाव जेवन त्यानंतर हरिजागर होईल.
तसेच बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते ११ हभप प्रकाश महाराज बोधले डिकसळ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संयोजक हभप भिमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर असतील.
गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, अमोल महाराज चाकरवाडी, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे आहेत.