जामखेड न्युज——
जामखेड तालुक्याची नवोदय परीक्षेतील कामगिरी अभिमानास्पद -पोलीस निरीक्षक महेश पाटील

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याची शैक्षणिक प्रगती तसेच नवोदय प्रवेश परीक्षेतील कामगिरी अभिमानास्पद आहे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.

नवोदय विद्यालय अहमदनगर स्पर्धा परिक्षेत पात्र झालेल्या नऊ विद्यार्थी व मिशन आरंभ 2024 गुणवत्ता यादीत निवड झालेल्या अकरा मुलांचा भव्य सत्कार समारंभ डॉ. ए. पी. जे. कलाम सभागृह, ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड येथे संपन्न झाला.जामखेड तालुक्यात शैक्षणिक व ऐतिहासिक कामगिरी क्रांती घडवून आणणारे गटशिक्षणधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पड़लेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश पाटील व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते बापूसाहेब तांबे हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी शिक्षण विभाग जामखेड चे विशेष कौतुक व अभिनंदन करत गटशिक्षणधिकारी धनवे साहेब यांच्या कार्यकाळात तालुक्यात शैक्षणिक उठाव झाला आहे.कायदा मोडणाऱ्या व गुन्हेगारी विश्वात असणाऱ्या 2% पेक्षा कमी समाजासाठी पोलिस प्रशासन काम करते पण 98% समाजाला घडवण्याच पवित्र कार्य शिक्षक वर्गाकडून घडत आहे.वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षकी पेशाविषयी कमालीचा आदर क़ायम मनात असतो.खरी गुणवत्ता ग्रामीण भागातच असून धनवे साहेब यांच्यासारखे अधिकारी असतील तर निश्चित तालुक्याला भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.

शिक्षक संघाचे राज्य नेते बापूसाहेब तांबे यांनी जामखेड तालुक्याची अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असून सुद्धा मिशन आरंभव नवोदय परीक्षेतील यश नक्कीच उल्लेखनीय आहे.धनवे साहेबांच्या कार्य काळात गुणवत्ता,सांस्कृतिक स्पर्धा व क्रीड़ा स्पर्धात जामखेड तालुक्याचा एक प्रकारचा दबदबा निर्माण झालेला आहे. परंतु अशैक्षणिक कामे कमी झाली पाहिजेत. येत्या जूनपासून शिक्षकांना करावी लागणारी अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणधिकारी धनवे यांनी हे यश विद्यार्थी व शिक्षकांच्या मेहनतीला समर्पित केले. तालुक्यात आल्यापासून प्रत्येक शाळेला भेट दिली. तेव्हा 90% शिक्षक पूर्वीपासून कामे करतातच. फक्त योग्य दिशा व प्रसिद्धिपासून दूर होती. त्यांच कौतुक करण्याची आवश्यकता होती.मेडिकल बिल, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, जूनी पेंशन प्रस्ताव सारखे शिक्षकांचे प्रश्न जलद गतीने व प्राधान्याने सोडवले.

यावेळी शिक्षक बँकचे मा.चेअरमन नवनाथ तोड़मल, जामखेड शिक्षक बँकचे संचालक संतोषकुमार राऊत,जूनी पेंशन संघटनेचे राज्य नेते राजेंद्र ठोकळ, शिक्षक नेते भागवत खेडकर उपस्थित होते. यावेळी शिक्षक मनोगतात गुरमाऊली-सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री एकनाथ चव्हाण, शिक्षक नेते नारायण राऊत यांची मनोगते झाली.
चि. शौर्य विकास हजारे याने अतिशय सुंदर शब्दात त्याचे मनोगत मांडले. यावेळी जामखेड मधील केंद्रप्रमुख केशव गायकवाड,रामराव निकम, राजेंद्र त्रिबके,नवनाथ बड़े, सुरेश मोहिते, विक्रम बड़े आदि उपस्थित होते.
शिक्षकांमधून गुरुकुलचे नेते अनिल अष्टेकर,गुरुमाऊली-सदिच्छा मंडळ नगर दक्षिण जिल्हाप्रमुख केशवराज कोल्हे, शिक्षक नेते किसन वराट, शिक्षक संघ(रोहकले गट)तालुकाध्यक्ष नानासाहेब मोरे, शिक्षक संघ(तांबे गट)तालुकाध्यक्ष गणेश नेटके नवनाथ बहीर,आबा पारखे, बाळासाहेब ज़रांडे आदि शिक्षक उपस्थित होते.
या गोड़ कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त श्री मुकुंदराज सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक डॉ. मनोहर इनामदार यांनी मांडले.


