जामखेड न्युज——
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे शिक्षकांची दिपावली गोड
जामखेड तालुक्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणीचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर प्रलंबित होता. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न हातात घेऊन दि. ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी ४२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली आहे.
शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना होते. परंतु त्यांच्याकडील जिल्ह्याच्या कामाचा व्याप पाहता त्यांनी आपले अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान केले.
यानंतर जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व शिक्षकांची सेवा पुस्तके अद्ययावत केली. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव तपासून ४२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
त्यांची दिवाळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी गोड केल्याची भावना शिक्षकांनी बोलून दाखवली. यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, अधीक्षक चौसाळकर, विस्तार अधिकारी जाधव, वरिष्ठ सहायक प्रताप गांगर्डे, कनिष्ठ सहायक सुरज मुंडे, नरवणे यांचे सहकार्य लाभले.