जामखेड न्युज——
जाताना मोकळे जाल येताना हप्ता जमा झालेला असेल – खासदार डॉ. सुजय विखे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळावे हिच भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी विविध विकास कामांचे भूमीपूजन तसेच शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजने’तून पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाला जाताना मोकळे जाल पण येताना पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमधील विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यासाठी खासदार सुजय विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आज जामखेड येथे पंचायत समिती सभागृहात अधिकारी व पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ एप्रिलमध्ये जाहीर केली होती. त्यानुसार ‘पीएम किसान योजने’च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजने’तून पहिला हप्ता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रातांधिकारी सायली साळुंखे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, रवी सुरवसे, डॉ. भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचारणे, सोमनाथ राळेभात, बिभीषण धनवडे, अंकुश ढवळे, वैजनाथ पाटील, मनोज कुलकर्णी, बंकट बारवकर, भिमराव कापसे, प्रा. अरूण म्हस्के, प्रा.अरूण वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातून कशा प्रकारे बसचे नियोजन असेल यांच्या सूचना अधिकारी व पदाधिकारी यांना देण्यात आल्या. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण शिर्डीच का याबाबत ते पवित्र असे ठिकाण आहे म्हणून शिर्डीची निवड केली असे सांगितले.
चौकट
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत भुमिका विचारली व भाजपाचा जाहीर निषेध केला. यावेळी खासदार डॉ सुजय विखे यांनी सांगितले की, मी मराठा आरक्षणासाठी समाजाबरोबरच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत सर्व अहवाल सादर करणार आहे. आरक्षण मिळावे अशी माझी भुमिका आहे असे विखे यांनी सांगितले.