जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली विनंती
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कुकडी डाव्या कालव्यावरती मतदारसंघातील ५४ गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. खरीप हंगामातील आवर्तन नुकतेच पूर्ण झाले असेल आवर्तन कमी दाबाने सोडल्याने काही गावातील लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही. याबाबतच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी परिसरातील लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत याकडे सर्वांचे लक्ष वेधले व पाणी नियोजनाबाबत रब्बी व उन्हाळी हंगामासाठीच्या ३ आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठीची विनंती केली.
सीना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे कुकडी प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठीचे एकूण तीन आवर्तनाचे योग्य नियोजन व्हावे आणि सिना कालव्याच्या योग्य नियोजन करण्यासाठी कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्यात यावे जेणेकरून सीना कालव्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करता येईल आणि सीना कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तन सोडावे अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठकीत केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ओलिताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने सदरील तीन आवर्तनाचे योग्य नियोजन करून आवर्तन सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती यावेळी बैठकीत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून २ आवर्तन सोडण्याचा निर्णय हा मंजूर झाला असून तिसरे आवर्तन सोडण्याबाबत कालचा नगर समितीचे अध्यक्ष अजित पवार हे सकारात्मक असून येत्या काही महिन्यात त्याबाबतही बैठक ठेवून निर्णय घेतला जाणार आहे.