जामखेड न्युज——
विजयसिंह गोलेकर यांना तालुकाध्यक्ष करावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकत्रित निवेदनाद्वारे मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांची नियुक्ती करावी अशी एकमुखी मागणी तालुक्यातील पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी खुद्द आ.रोहित पवार यांच्या कडे केली असून आ.रोहित पवार यावर काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची नुतन कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यासंदर्भात भूमिका घेतली असून पक्षफुटीनंतर त्यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील पक्षसंघटना वाढीची अतिरीक्त जबाबदारी आपसुकच पडल्याने नवनियुक्त तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर आमदारांच्या अनुपस्थितीत पक्षसंघटना वाढीची व सांभाळण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना पक्षाला लवकरच सामोरे जावे लागणार आहे. त्यातच पुर्वीपासूनच जोरदार संघटनात्मक रचना असणाऱ्या भाजपाला प्रा.आ.राम शिंदे यांच्या विधान परिषदेवरील आमदारकीने नवसंजीवनी मिळाली आहे. त्यातच नुकत्याच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रा.आ.राम शिंदे यांना मंत्रीपद मिळाल्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांना हा ‘बुस्टर डोस’ असणार आहे.
भाजपाचा बालेकील्ला असणाऱ्या जामखेड तालुक्यात व विशेषत: खर्डा भागात मोठा संघर्ष करत विजयसिंह गोलेकर यांनी पक्षसंघटना जिवंत ठेवली. सर्वांना सोबत घेऊन एकनिष्ठपणे काम करणारे एक धाडसी व कृषी पदवीधर उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा व प्रदेश कार्यकारीणीच्या विविध पदांवर त्यांनी काम केले असून अनेक जिल्ह्यांच्या पक्ष निरीक्षकाची जबाबदारी ही पार पाडली आहे. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, विविध शासकीय समित्यांवर काम करतानाच गेल्या अनेक वर्षांपासून खर्ड्याची ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी पक्षाच्या ताब्यात ठेवण्यात त्यांची मोठी भूमिका असते.सध्या ते राष्ट्रवादी चे जिल्हा संघटक पदी कार्यरत आहेत.
अनेकवेळा पक्षाकडून अन्याय होऊनही पक्षाशी इमान राखणाऱ्या श्री.गोलेकर यांना त्याचे बक्षीस म्हणून तालुकाध्यक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष मधुकर राळेभात, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जिल्हा परीषद सदस्य शहाजी राळेभात, माजी सभापती संजय वराट व सुर्यकांत मोरे, जामखेडचे माजी नगराध्यक्ष विकास राळेभात व निखिल घायतडक, युवकचे माजी तालुकाध्यक्ष शरद शिंदे व मनोज भोरे, चोंडीचे सरपंच सुनील उबाळे, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, जवळक्याचे मा.सरपंच कांतीलाल वाळुंजकर, अरणगावचे मा.सरपंच संतोष निगुडे, बोर्ले सोसायटीचे चेअरमन गणेश चव्हाण, खर्डा सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर, युवानेते सचिन डोंगरे, अरुण गाडेकर आदी ज्येष्ठ व तरुण नेत्यांनी केली आहे.
सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष पदासारख्या महत्वाच्या पदावर एकमताने एखाद्या व्यक्तीची शिफारस करणे हे तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच घडत आहे. यानिमित्ताने तालुकाध्यक्ष व कार्यकारीणीच्या निवडप्रक्रीयेत आम्हालाही विश्वासात घ्या अशी भुमिका या सर्व प्रमुख नेत्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा आमदार रोहित पवार यांच्या कडे केल्याची चर्चा आहे.