जामखेड न्युज——
जागतिक शिक्षक दिनी जामखेड येथील शिक्षक रविंद्र भापकर इन्फोसिस संस्थेकडून सन्मानित
जामखेडच्या शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री रवींद्र भापकर यांची राज्य संसाधन गट सदस्यपदी निवड ही जामखेड शिक्षण विभागासाठी आनंदाची मानाची बाब आहे असे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सांगितले.
जामखेड तालूक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरदवाडी ता. जामखेड येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक श्री. रवींद्र भापकर सर यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने नुकतीच NCERT नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य संसाधन गट (State Resourse Group) सदस्य पदी निवड झाली आहे. नुकतेच 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांना इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय संस्थेने सन्मानित करून त्यांचे कार्य आपल्या प्लॅटफॉर्म वर देखील अपलोड केले आहे.
जामखेड तालुक्यातील शिक्षक व शिक्षण विभागासाठी ही नक्कीच आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे यांनी केले आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे यांनी तालुक्याचा चार्ज घेतल्यापासून जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात सुवर्णमय घोडदौड चालू आहे. शिक्षकांना प्रेरणा देवून त्यांचेकडून काम करून घेण्याचे त्यांचे कौशल्य खरोखर अप्रतिम असे आहे. श्री धनवे साहेब हे सतत काम करण्याची प्रेरणा देतात त्यामुळे आणखी कार्य करण्यास ऊर्जा मिळते असे श्री भापकर यांनी सांगितले.
या निवडीबद्दल श्री भापकर यांचे केंद्रप्रमुख श्री सुरेश मोहिते, विस्तार अधिकारी सुनील जाधव, श्री राजेंद्र त्र्यंबके व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे यांनी अभिनंदन केले आहे.