विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा पुनःरिक्षण कार्यक्रम घोषित मागील शिक्षक निवडणुकीत नाव असले तरी नव्याने नाव नोंदवावे लागणार!!!

0
112

जामखेड न्युज——

विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा पुनःरिक्षण कार्यक्रम घोषित

मागील शिक्षक निवडणुकीत नाव असले तरी नव्याने नाव नोंदवावे लागणार!!!

 

भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

शनिवार दि. 30 सप्टेंबर, 2023 मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31( 3 ) नुसार जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक, सोमवार दि. 16 ऑक्टोबर, 2023 मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(4) नुसार जाहीर सूचनेची प्रथम पुर्नप्रसिध्दी करण्याचा दिनांक, बुधवार दि. 25 ऑक्टोबर, 2023 मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) नुसार जाहीर सूचनेची व्दितीय पुर्नप्रसिध्दी करण्याचा दिनांक, सोमवार दि.6 नोव्हेंबर, 2023 नमुना 19 व्दारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक, सोमवार दि.20 नोव्हेंबर, 2023 हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई, गुरुवार दि.23 नोव्हेंबर, 2023 प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, गुरुवार दि.23 नोव्हेंबर ते शनिवार 9 डिसेंबर, 2023 दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, सोमवार दि.25 डिसेंबर, 2023 दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी मतदार याद्या तयार करणे व छपाई करणे, शनिवार दि.30 डिसेंबर, 2023 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी


नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या वरील मतदार नोंदणी पुनःरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी प्रक्रीया ही पुन्हा नव्याने (de-novo) राबविण्यात येते. मागील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची मतदार यादी ही या निवडणूकीसाठी उपयोगात येणार नाही. मागील म्हणजेच सन 2018 च्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदार यादीत नाव नोंदविलेले असले तरी ही यादी सन 2024 च्या निवडणूकीसाठी वापरात येणार नसल्याने पात्र मतदारांनी आता पुन्हा नव्याने (de-novo) मतदार नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. मागील निवडणूकीच्या मतदार यादीत नाव आहे म्हणून या निवडणूकीसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्याची आवश्यकता नाही, असे मुळीच नाही हे लक्षात घ्यावे. या निवडणूकीसाठी नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेले असेल, तरच या निवडणूकीत मतदार म्हणून मतदान करता येईल.

शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करणेसाठी अर्हता दिनांक (Qualifying Date) दि. 1 नोव्हेंबर 2023 असा राहील. अर्हता दिनांकांच्या (नोव्हेंबर) मागील सहा वर्षापैकी किमान तीन वर्षात राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत (कमीतकमी 10 वी पर्यंतचे वर्ग असलेली) अथवा महाविद्यालयात शिकविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षक, प्राध्यापक पूर्णवेळ शिकविणारा असावा, तासिका तत्वावर अथवा अर्धवेळ शिकविणारा नसावा.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करण्यासाठी विहीत नमुना अर्ज क्र. 19 असुन हा अर्ज मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरता येईल. अर्जासोबत पासपोर्ट फोटो आणि पात्र अर्जदार शिक्षक यांचा मागील सहा वर्षांपैकी किमान तीन वर्षाचे राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त कमीतकमी माध्यमिक शाळेत शिकविण्याचा अनुभव असल्याचे संबंधित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करावे. शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्जदाराचा नाशिक विभागात सर्वसाधारण रहिवास असावा. मतदार नोंदणीसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी मतदार नोंदणीचे विहीत नमुना अर्ज क्र. 19 उपलब्ध आहेत.

दि. 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणा-या मतदार नोंदणीसाठीच्या सर्वसाधारण जाहीर सूचनेनुसार नेमुन दिलेल्या पदनिर्देशित अधिकारी कार्यालयात मतदार नोंदणीसाठी मार्गदर्शन देखील केले जाईल. तसेच पूर्ण भरलेले अर्ज जमा करता येतील. अर्जावर अर्जदाराचा विहीत फोटो आणि स्वाक्षरी असावी. अर्जातील आवश्यक तपशील पुर्ण भरलेला असावा. अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्राची प्रत जोडलेली असावी. अर्ज सादर करतेवेळी अर्ज तपासुन घ्यावा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमुद करता येईल. तसेच भ्रमणध्वनी, दुरध्वनी क्रमांक देखील नमुद करता येईल. पोस्टाने आलेले,हस्त बटवडा आलेले एक गठ्ठा अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. मात्र शासनमान्य माध्यमिक शाळा (कमीतकमी 10वी पर्यंत वर्ग असलेल्या), महाविद्यालय यांच्या प्रमुखांमार्फत त्यांच्या अधिनस्त शिक्षक, प्राध्यापक यांचे अर्ज कार्यालयीन पत्राव्दारे आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर केल्यास तपासून स्विकारण्यात येतील. तसेच कुटूंब प्रमुख त्यांचे कुटूंबातील सदस्यांचे अर्ज मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे अधीन राहून दाखल करु शकतील.

लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 च्या कलम 17 नुसार मतदारास एकापेक्षा जास्त मतदारसंघात नाव नोंदविता येणार नाही. तसेच कलम 18 अन्वये मतदारास एका मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळेस नांव नोंदविता येणार नसल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here