जामखेड न्युज——
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पाडळी फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने टी.व्ही व टायर जाळून निषेध व्यक्त
जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज तालुक्यातील पाडळी फाटा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी बंद ठेऊन रस्त्यावर उतरत टीव्ही व टायर जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजाचे आंदोलन उधळत मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जामखेड बंदची हाक देण्यात आली होती.
याच अनुषंगाने जामखेड करमाळा रोडवरील पाडळी फाटा या ठिकाणी देखील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यानंतर पाडळी फटा पंचक्रोशीतील मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यांनी पाडळी फटा रोडवर जमा होत आरक्षण मागणीच्या घोषणा देत रस्त्यावर उतरत टीव्ही व टायर जाळून घटनेचा निषेध केला. या बंद मध्ये समस्त पाडळी फाटा येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता .
यावेळी झिक्रीचे सरपंच दत्ता साळुंखे, सरपंच शहाजी गाडे, दत्ता रासकर, गणेश पवार, माऊली डिसले, शिवानंद काळे, काशिनाथ डुचे, तुळशीदास शिरसाठ, आकाश खैरे, विष्णु वाळके, रोहीत कसाब, गोवर्धन गाडे, अतुल शिनगारे, आशोक गाडे, तुषार पवार, डॉ कारंडे, संभाजी इकडे, आकाश पवार सह अनेक पाडळी फाटा येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खर्डा व जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात कडकडीत बंद ….
सकल मराठा समाजाच्या वतीने काल जामखेड तालुका बंद ची हाक देण्यात आली होती या हाकेला खर्डा व जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक गावातील व्यापारी व ग्रामस्थांनी पाठींबा देत आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे दिवसभर खर्डा व जामखेड शहरातील बाजारपेठ बंद होती. त्यामुळे शहरात शुकशुकाट दिसून येत होता. यावेळी पोलीसांनी कोठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्तीने आपली दुकाने बंद ठेवल्याने जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापारी व ग्रामस्थांचे आभार मानले.