जामखेड न्युज——
आशियाई कुस्ती स्पर्धेत शिऊर येथील पै. सुजय तनपुरे याने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल खासदार शरद पवार यांच्या हस्ते सन्मान
जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने जॉर्डन, ओमान येथे १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघातील महाराष्ट्राचा पहिलवान सुजय तनपुरे याने ६८ किलो वजन गटात जपानच्या तुल्यबळ मल्लाला पराभूत करत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तनपुरे याने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सन्मान केला. सुजय तनपुरे हा जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा रहिवासी आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पणे येथे तो सराव करतो. त्याला वस्ताद पंकज हरपुडे, वस्ताद महेश मोहोळ, हिंदकेसरी रोहित पटेल, त्रिवार महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. पहिलवान सुजय तनपुरे हा मुंबई येथे आला असता आमदार रोहित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घालून दिली.
यावेळी खासदार पवार यांनी पै. सुजय तनपुरे यास पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचे वस्ताद पंकज हरपुडे, उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान अक्षय शिंदे, एशियन चॅम्पियनशिप सुवर्ण पदक विजेता सुजय (सोन्या) तनपुरे आदी उपस्थित होते.