जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाला यश, उद्योगमंत्र्यांनी दिलं ‘हे’ आश्वासन
विधिमंडळाचे पावसाळी अधिवशेन सुरू असून यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ते एकटेच आंदोलनाला बसले. दरम्यान यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्यांची समजूत काढत त्यांना आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतलं.
रोहित पवारांची भेट घेतल्यानतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात एमआयडीसी साठी आंदोलन सुरू केलं होतं, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार उद्याच उद्योग विभागाकडून कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी बैठक घेतली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. यासाठी जी अधिसूचना काढावी यासाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. रोहित पवारांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे. सरकार एमआयडीसाठी सकारात्मक अधिसूचना लवकरात लवकर काढली जाईल आणि त्यासाठी उद्या बैठक घेतली जाईल असे उदय सामंत म्हणाले.
उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की माझ्या मतदारसंघात रोजगाराच्या अडचणी सुटव्या म्हणून आज आंदोलन केलं. गेल्या वर्षभरात अनेकवेळा उदय सामंत, मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो. मागे काय झालं त्यात न जाता आज अनेक नेते येऊन भेटले. उदय सामंत साहेब यांनी येऊन उद्या बैठक घेण्याचा शब्द दिला आणि अधिवेशन संपण्याअगोदर अधिसूचना काढणार असाही शब्द दिला. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून विश्वास ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझं आंदोलन मागे घेतोय, असे रोहित पवार म्हणाले. जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर, माझ्यासह माझ्या मतदारसंघातील अनेक आमदार मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.