जामखेड न्युज——
कर्जत बाजार समितीतही राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का; सभापती, उपसभापतीही भाजपचाच
यामुळे पंधरा दिवसात तिसरा धक्का दिला आहे. पहिला जामखेड बाजार समिती, दुसरा खर्डा ग्रामपंचायत तर तिसरा कर्जत बाजार समिती
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठच
कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या गटाचे नऊ सदस्य तर आमदार रोहित पवार यांच्या गटाचे नऊ सदस्य अशी समसमान संख्या असताना यामध्ये सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यामध्ये आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली असून राम शिंदे यांच्या गटाचे सभापतीपदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाले आणि ते विजयी झाले, तर आमदार रोहित पवार गटाचे सभापतीपदाचे उमेदवार यांना आठ मते मिळाल्याने ते पराभूत झाले.
एक मत अवैध ठरल्याचं बोललं जात आहे. एक मत अवैध ठरल्यामुळे आमदार राम शिंदे गटाचे काकासाहेब तापकीर हे कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदी निवडून आले.
उपसभापतीपदाच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे गटाचे अभय पांडुरंग पाटील यांना दहा मते मिळाली आणि ते विजयी ठरले. तर आमदार रोहित पवार गटाचे उमेदवार श्रीहरी कैलास शेवाळे यांना आठ मते मिळाल्याने ते दोन मतांनी पराभूत झाले. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या गटाचे एक मत फुटल्याचं बोललं जात आहे.
सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेनंतर एक मत बाद झाल्याचे स्पष्ट झाल्याने आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाच्या उमेदवारास नऊ सदस्य पाठीशी असताना आठ मते मिळाल्याने एक प्रकारे आमदार पवार गटाचा सदस्य फुटल्याची चर्चा आहे.
जामखेड पाठोपाठ कर्जत बाजार समितीही शिंदेंच्या ताब्यात
आमदार राम शिंदे यांनी जामखेड पाठोपाठ कर्जतमधील ही बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये घेत आमदार रोहित पवार यांना राजकीय धोबीपछाड दिली आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिंदे आणि आमदार पवार यांच्या दोन्ही गटाचे नऊ-नऊ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ईश्वर चिट्ठीच्या आधारे निर्णय घेण्यात आला आणि त्यात आमदार शिंदे यांच्या गटाचे उमेदवार हे सभापतीपदी निवडून आले होते. त्यानंतर आज कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राम शिंदे यांनी बाजी मारत आमदार रोहित पवारांना मोठा धक्का दिला आहे.