भटके विमुक्तांच्या विकासासाठी लवकरच कृती आराखडा. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांची घोषणा.

0
211

जामखेड न्युज——

भटके विमुक्तांच्या विकासासाठी लवकरच कृती आराखडा.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांची घोषणा.

 

भटके विमुक्त जमातीच्या समूहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्या पर्यंत पोहचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी लवकरच एक कृती आराखडा तयार करून राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची घोषणा समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी केले.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगर व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महा ज्योती) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा.ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भटके विमुक्त जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना व आश्रम शाळांच्या प्रतिनिधींच्या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगरच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेस इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिक चे प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान विर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधा किसन देवढे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्या आमिना शेख, भाऊसाहेब खरे, भटके विमुक्त जमाती राज्यस्तरीय कल्याण समितीच्या सदस्य मुमताज शेख, भटके विमुक्त जमाती, जिल्हास्तरीय कल्याण समितीचे सदस्य ॲड. डॉ. अरुण जाधव, अनुदानित वसतिगृह संस्थाचालक महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे आदी मान्यवर यावेळी विचारपिठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माधव वाघ पुढे म्हणाले की, या कार्यशाळेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात एक चांगली सुरुवात झाली आहे. भटक्या विमुक्त समूहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी आणि माझे सर्व अधिकारी कार्यकर्ता अधिकारी म्हणून काम करणार आहेत. यासाठी करावयाच्या प्रत्यक्ष कामाचा कृती आराखडा तयार करून राज्यस्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. व आपणा सर्वानाच समतेचे दुत म्हणून कार्य करायचे आहे असे ते म्हणाले.

भगवान वीर म्हणाले की, एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के लोकसंख्या असलेल्या भटके विमुक्त समूहातील लोकांना त्यांच्यासाठी असलेल्या सर्व योजना त्यांच्या पर्यंत पोहचवायच्या आहेत त्यासाठी त्यांना जातीचे दाखले, रेशनकार्ड व घरकुल योजना या ३ मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याच बरोबर भटके विमुक्त समूहातील १४ वर्षा खालील एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठीही विशेष उपक्रम व उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारीही आपण घेणार आहोत असे ते म्हणाले.

मुमताज शेख म्हणाल्या की, अहमदनगर सह एकूण ४ जिल्ह्यात भटके विमुक्त समूहातील लोकांसाठी पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर विविध ६ मुद्द्यांवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरच समिती काम करणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपली ताकद पणाला लावली पाहिजे.

ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, मार्च आणि एप्रिल हे २ महिने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे म्हणजेच त्यांच्या विचारातून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठीचे महिने आहेत. भटके विमुक्त समूहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत कौतुकास्पद असून जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, संस्था व संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

यावेळी अमिना शेख, बापू ओहोळ, नागेश गवळी, भगवान यांनीही आपले मनोगत केले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधा किसन देवढे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एस. एन. शेख यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण निरीक्षक संगीता नांगरे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, आश्रम शाळांचे प्रतिनिधी, विविध संस्था व संघटना तसेच आदिवासी भटके विमुक्त समूहातील महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here