जामखेड न्युज——
ताराचा करंट बसून वासराचा मृत्यू
साकतला कायमस्वरूपी वायरमन नसल्याने नागरिकांना करावा लागतो अडचणीचा सामना
गेल्या काही दिवसांपासून साकतला कायमस्वरूपी वायरमन नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लाईटच्या तुटलेल्या ताराचा करंट बसून वासराचा मृत्यू झाला आहे. लवकरात लवकर कायमस्वरूपी वायरमन द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काल साकत परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही ठिकाणी मेन लाइनचे पोलही पडले होते गावात काही ठिकाणी तारा तुटलेल्या होत्या याची कल्पना महावितरण कार्यालयास देऊन देखील कायमस्वरूपी वायरमन नसल्याने लवकर तारा दुरूस्ती झाली नाही आज सुरेश तावरे या शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी गेले असता एका वासराला करंट बसून जागीच मृत्यू झाला.
तसेच गावात अनेक वेळा लाईटचा घोटाळा झाला तर तो दुरूस्त करण्यासाठी कोणी नसते. अनेक वेळा तर फ्युज गेली तरी कोणी टाकण्यासाठी नसते यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात रात्र रात्र उकाडा सहन करावा लागतो. तसेच जीवितहानीही होत आहे त्यामुळे लवकरात लवकर कायमस्वरूपी वायरमन द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.