जामखेड न्युज——
अनाथांची सेवा, हीच खरी ईश्वर सेवा- बापूसाहेब तांबे
शिक्षक विकास मंडळाकडून “बालघर प्रकल्पास” वॉशिंग मशीन भेट

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणजे जो आपले, तोच साधू ओळखावा ,देव तेथेची मानावा ,याप्रमाणे बालघर प्रकल्पातील कार्य आहे. अनाथ व वंचित समाजातील निराधार मुला मुलींसाठी अहमदनगर शहरात बालघर प्रकल्पात या मुलांचं संगोपन संस्कार, व शिक्षणाचे कार्य उत्तम आहे ,असे प्रतिपादन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते श्री बापूसाहेब तांबे यांनी केले. ते अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ यांच्या वतीने बालघर प्रकल्पास वॉशिंग मशीन भेट देण्यात आले. तेव्हा आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष विलास गवळी, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, श्री संतोष दुसूंगे, माजी व्हा. चेअरमन अर्जुनराव शिरसाठ, विकास मंडळाचे सचिव संतोष मगर, विश्वस्त श्री राजेंद्र निमसे, श्री बाळासाहेब गमे, प्रल्हाद भालेकर , पाथर्डी शिक्षक संघाचे अध्यक्ष भीमराव चाच, संजय चव्हाण,या प्रकल्पाचे व्यवस्थापक युवराज गुंड, विकास मंडळाचे व्यवस्थापक श्री सुरेंद्र आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री बापूसाहेब तांबे पुढे म्हणाले की, आज समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना अनाथ व निराधार, वंचित समाजातील मुलांसाठी बालघर प्रकल्प हा भारतातील आदर्श संस्कृतीचा नमुना आहे. या प्रकल्पाचे संचालक श्री युवराज गुंड यांनी नोकरीच्या मागे न लागता अनाथ मुला मुलींची जबाबदारी स्वीकारली आहे, ते खरे अनाथांचे नाथ आहेत. त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. अशा मुलांच्या मदतीसाठी इतरांनी पुढे येण्याची गरज आहे .तसेच जिल्ह्यातील शिक्षकांनी वाढदिवस, पुण्यस्मरण यानिमित्त या बालघर प्रकल्पास अन्नदानाच्या रूपाने मदत करावी, असे आवाहन केले. अहमदनगर जिल्ह्यातील विकास मंडळ या संस्थेद्वारे गोरगरीब, अनाथ मुला मुलींना तसेच वृद्धाश्रम व गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रम घेऊन गरजूंना गरजेप्रमाणे दरवर्षी मदत केली जाते .आपण समाजाचे काही देणे लागतो, त्यातून उतरायी होण्याचा विकास मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो.
यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री साहेबराव अनाप यांनी अनाप व वंचित मुला-मुलींना आधार देणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभ करणे, हे काम समाजासाठी आदर्श आहे .शासनाचे कोणतेही अनुदान नसताना लोकसहभागातून बालघर प्रकल्प चालवणे फार कठीण आहे. तरीही हे अवघड काम या प्रकल्पामार्फत सुरू आहे. युवराज गुंड हे श्री बापूसाहेब तांबे यांचे विद्यार्थी आहेत. श्री बापूसाहेब तांबे यांनी या प्रकल्पासाठी सुरुवातीपासूनच मदत आणि पाठबळ दिलं आहे. सामाजिक बांधिलकी जपत हे कार्य करणारे श्री युवराज गुंड यांचा आदर्श इतरांनी घ्यावा.
विकास मंडळाचे अध्यक्ष विलासराव गवळी यांनी विकास मंडळ हे सामाजिक बांधिलकी जपत आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची ही संस्था असून या संस्थेद्वारे असे उपक्रम आम्ही राबवतो .यापुढे या सामाजिक कार्यासाठी विकास मंडळ बांधिल राहील, तसेच विकास मंडळाचे नियोजित गुरुजी हॉस्पिटलद्वारे अनाथ व निराधार मुलांसाठी मोफत उपचार करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी बालघर प्रकल्पाचे संचालक श्री युवराज गुंड यांनी या अनाथालयातील मुला मुलींचे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन ची नितांत आवश्यकता होती .ती आज पूर्ण झाली. विकास मंडळाने आमच्या गरजेप्रमाणे ही मदत देऊन आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
चौकट
यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन श्री संतोष दुसंगे व माजी व्हाईस चेअरमन अर्जुनराव शिरसाट यांनी या अनाथ मुलांच्या एका दिवसाच्या अन्नदानासाठी ३१०० रुपयांची देणगी दिली.




