Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे कुकडीचे रब्बी आवर्तन शेतीसाठी मिळाले वेळेत

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे कुकडीचे रब्बी आवर्तन शेतीसाठी मिळाले वेळेत

0
203

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे कुकडीचे रब्बी आवर्तन शेतीसाठी मिळाले वेळेत

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी रब्बी आवर्तन वेळेत व उच्च दाबाने मिळावे यासाठी आ.रोहित पवारांनी वेधले मंत्र्यांचे लक्ष; केलेली मागणी झाली मान्य

शेतीला गरजेच्या वेळी पाणी मिळावे यासाठी आ. रोहित पवार प्रयत्नशील; कुकडी रब्बी आवर्तन व उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील शेतीला पाणी मिळावे याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा

पाणी नियोजनाबाबत पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन योग्य वेळेत व उच्च दाबाने सोडण्याबाबत तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या शेतीला नदीतून पाणी मिळावे याबाबत चर्चा केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत तालुक्यातून कुकडी डावा कालवा जातो. त्याचा तालुक्यातील एकूण 54 गावांना शेतीसाठी उपयोग होतो. पावसाळा संपून तब्बल दोन महिने झाले असून कुकडी लाभ क्षेत्रातील गावातील पाणी पातळी काही प्रमाणात खाली गेलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास ते जळून शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होऊ शकते. सध्या या पिकांना पाण्याची गरज आहे. तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून कुकडी आवर्तनाबाबत वेळोवेळी मागणी होत आहे. ही सल्लागार समितीच्या लक्षात आणून देत कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन उच्च दाबाने व योग्य वेळेत सोडण्याबाबतची मागणी त्यांनी यावेळी केली.

काही दिवसांपूर्वीच कुकडी बांधकाम वितरण विभाग कोळवडी येथे शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या सोबत पाणी नियोजनाबाबत आमदार रोहित पवार यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार तारखा निश्चित करून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी १ जानेवारीला रब्बीचे पहिले आवर्तन १ मार्चला दुसरे आवर्तन व १ मेला उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी त्यांनी यावेळी बैठकीत केली आणि त्या अनुषंगाने ती मान्य देखील करण्यात आली आहे. दुसऱ्या आवर्तनानंतर तिसऱ्या आवर्तनानाबत बैठक घेऊन ते ही सोडलं जाईल. गेल्या वर्षी कमी पाणी असतानासुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता. यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने यंदाचे नियोजन होईल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्जत तालुक्यात असलेली मौजे बाभूळगाव दुमला, शिंपोरा, आवटेवाडी, खेड (शिवशंभोवाडी), गणेशवाडी, भांबोरा, सिद्धटेक, बेर्डी व दुधोडी ही गावे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या सुरुवातीची गावे असल्याने या गावांच्या शेतीला मार्चपासूनच पाणी अपुरे पडण्यास सुरुवात होते. हीच गोष्ट आमदार रोहित पवार यांनी बैठकीत उपस्थित मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देत उन्हाळ्याच्या सुरुवातीस या गावांना शेतीसाठी पाणी मिळण्याच्या दृष्टीने नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे. योग्य नियोजन झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस गावांना शेतीसाठी पाणी मिळाले तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. यावेळी आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. त्यावर मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार अशोक बापू पवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!