कुकडीचे तीन आवर्तन सोडा – आमदार राम शिंदे यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

0
231

 

जामखेड न्युज——

कुकडीचे तीन आवर्तन सोडा – आमदार राम शिंदे यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

जामखेड – कर्जत तालुक्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातून नियमितपणे तीन आवर्तने सोडण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रा राम शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आज पत्राद्वारे केली आहे.

कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्पातून रब्बी हंगाम सन 2022-23च्या आवर्तन नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक विधान भवन, पुणे (Council Hall, Pune) येथे गुरुवारी पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे होते. सदर बैठक सुरु असताना आमदार प्रा राम शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून आवर्तनाबाबत मोठी मागणी केली आहे.

कुकडी डावा कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात यावे ( 1 रब्बी व 2 उन्हाळी), 25 डिसेंबरला 1 ले रब्बी आवर्तन सोडण्यात यावे, 25 फेब्रुवारीला 2 रे आवर्तन सोडावे (उन्हाळी), 20 एप्रिल ला 3 रे आवर्तन सोडावे ( उन्हाळी), सर्व लाभधारक शेतकऱ्यांच्या पाणी मिळेल याचे नियोजन करून अंमलबजावणी करावी, पाणी पुर्ण दाबाने मिळवण्यासाठी स्काॅड ची नियुक्ती करावी ( रात्रीच्या वेळी गरज पडते, काळजी घ्यावी), टेल टू हेड नियमानुसार पाणी देण्याची अंमलबजावणी करावी, कर्जत तालुक्याला प्रत्येक वेळी टेलला पाणी उशिरा येते, काळजी घेण्यात यावी व पाणी देण्यात यावे, अश्या मागण्या आमदार प्रा राम शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत.

सद्य:स्थितीत घोड धरणात 15 डिसेंबर 2022 रोजी 100 टक्के पाणीसाठा आहे. रब्बी हंगामात 12391 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. पहिल्या आवर्तनात 10981 हेक्टर क्षेत्र भिजविण्यासाठी एका आवर्तनात पिकांच्या गरजेनुसार 31.14 दलघमी (1100 दलघफु) पाणी लागणार आहे. रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनाकरिता 35.67 दलघमी (1260 दलघफु) पाणी व जलाशय उपसा करिता 6.79दलघमी पाणी वापर होणार आहे. रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने देणे प्रस्तावित आहेत, परंतू आमदार प्रा राम शिंदे यांनी कुकडी डाव्या कालव्यातून कर्जत तालुक्यासाठी तीन आवर्तने सोडावेत, अशी मागणी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here