जामखेड न्युज——
चार दिवसात पार्सल नाही गेलं तर……. उद्धव ठाकरे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेतही दिले आहे. दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.
येत्या दोन चार दिवसात राज्यपालांचा विषय तडीस न्यावा लागेल. जे महाराष्ट्र प्रेमी, फुले प्रेमी, आंबडेकर प्रेमी आणि छत्रपती प्रेमी आहेत. त्यांना उभे राहावे लागेल. शिवाजी महाराज नसते तर कोश्यारी कुठे असते. सावित्रीबाई फुले नसत्या तर महिला शिक्षणाचं काय झालं असतं? याचं साधं भान राज्यपालांना राहिलं नाही. हे आता अति झालं. ज्यांना आगा पिछा नाही असे लोक राज्यपाल पदावर बसवले गेले आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. मिंधे सरकार आल्यापासून उद्योग बाहेर जात आहेत. हे कमी की काय आता राज्यपाल… मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही. ही व्यक्ती कोश्यारी महाराष्ट्राचा अवमान करत आहे.
त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंवर टीका केली. मुंबई आणि ठाणेकरांवर टीका केली. आता त्यांनी आमचे दैवत शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. बाप हा बाप असतो. तो जुना असतो का? त्यामुळे बेताल विधानं करणाऱ्या राज्यपालांना हटवलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
जे राज्यपाल येतात ते विचारधारा घेऊन येतात. कोश्यारी जे म्हणाले ती भाजपची विचारधारा आहे का? सर्वांनी एकत्र यावं. पार्टी बाजूला ठेवा. राज्याच्या अस्मितेसाठी एकत्रं येऊन बोललं पाहिजे. दोन चार दिवस वाट पाहू. हे पार्सल परत नाही गेलं तर आम्हाला काही तरी करावं लागेल. महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
आमच्याकडे मुख्यमंत्री पैचान कोन सारखे आहेत. उपमुख्यमंत्रीच बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांमध्ये बोलण्याची हिंमत नाहीये, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.