जामखेड न्युज——
जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या बांदल यांची निवड
जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या बांदल यांची निवड. अटीतटीच्या लढतीत सचिन जाधव यांचा १२ मतांनी पराभव केला तरी निवडणूकीतील विजय पराजयास जास्त महत्व न देता दोघांनीही एकमेकांचा सत्कार करत समाजापुढे एक वेगळाच अदर्श ठेवला आहे. या विजयाबद्दल तात्या बांदल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जामखेड तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनची आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत तात्या बांदल आणि सचिन जाधव हे दोनच उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे दोघांमध्ये सरळ सरळ व अतितटीची लढत झाली.

यावेळी १७८ सभासदांनी मतदान केले. यापैकी तात्या बांदल यांना ९५ मते, तर सचिन जाधव यांना ८३ मते मिळाली. यानुसार तात्या बांदल यांनी सचिन जाधव यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव केला व अटीतटीच्या लढतीत तात्या बांदल यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नारायण राळेभात, अनिल बोथरा व प्रविण कात्रजकर यांनी काम पाहिले.

निवडणूकीच्या निकालानंतर विजयी उमेदवार व पराभुत उमेदवार या दोघांनी खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले. दोघांनीही एकमेकांचा फेटा बांधुन सत्कार केला.

असे चित्र कोणतीही निवडणुक झाल्यानंतर पहायला मिळणे दुर्मिळच! मात्र या दोन्ही सभासदांनी दिलेला ‘कौल’ संयमाने स्विकारला आणि एकमेकांचा सन्मान करुन मेडिकल असोसिएशनच्या पुढील कार्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

निवडणूकीच्या निकाला नंतर या दोघाही उमेदवारांनी दाखवलेल्या खिलाडू वृत्तीचे दर्शन सर्वच निवडणुका लढवणाऱ्या व्यक्तींसाठी ‘आदर्शवत’ ठरेल.






