जामखेड न्युज——
शाळा बंद झाली तर मी ऊसतोड कामगार होणार!!!
शाळा बंद करु नका…बीडच्या लहानग्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र!!
जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा ऊस तोड कामगार म्हणून ओळखलो जाईल. अशा आशयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित बीडच्या लहानग्याने शाळा बंद करु नका अशी कळकळीची विनंती केली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले.
यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली. या पत्रानंतर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.