जामखेड न्युज——
पुण्यश्लोक अहिल्या मातेचा आदर्श ठेवून बँकेचा कारभार करणार -शिक्षक नेते बापूसाहेब तांबे
आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुमाऊलीचे सर्वेसर्वा श्री बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्याचा गुरुमाऊली मंडळ, शिक्षक एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडी यांचा झंजावती प्रचार दौरा संपन्न झाला. दौऱ्याची सुरुवात जामखेड मुले- मुली येथून झाली. त्यानंतर उर्दू मुले- मुली, इंदिरानगर, कुसडगाव, फक्राबाद, पिंपरखेड व शेवट पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी या ठिकाणी झाला.
त्यावेळी बापूसाहेब तांबे बोलत होते. मागील काळात बँकेमध्ये सर्व मंडळांनी सत्ता उपभोगली. प्रत्यक्षात 31 मार्च रोजी बँक तोट्यात असायची, परंतु कायम ठेवीवर सभासदांना कमी व्याजदर देऊन बँक नफ्यात दाखवली जायची. 2016 ला सत्ता आल्यानंतर तत्कालीन चेअरमन यांनी आम सभा बंद करून एकाधिकारशाही सुरू केली त्यामुळे त्यांच्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत आम्ही बँकेत लक्ष घातले नाही, कारण सभासदांना तसा शब्द दिला होता. परंतु त्यानंतर 2019 ला कारभार सुरु केल्यानंतर गुरुमाऊली मंडळाने इतर ठेवींप्रमाणे सभासदांच्या कायम ठेवीला व्याजदर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व त्या पद्धतीने वार्षिक सभेत उपविधी मध्ये दुरुस्ती केली.
त्यामुळे खऱ्या अर्थाने सभासदांना कायम ठेवीवर भरघोस व्याज मिळू लागले. कुटुंब निराधार योजनेमुळे कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या सभासदांच्या वारसांना भरघोस अशी मदत करून गुरुमाऊली मंडळांने या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. ही मदत देत असताना कोरोना महामारीत मृत्युमुखी पावलेल्या सभासदांची संख्या जास्त असल्यामुळे मयत निधीतून सात हजार रुपये ठेव वर्ग करून या कुटुंबांना आधार देण्याचे काम गुरुमाऊली मंडळांनी केले.
परंतु विरोधक याचा अपप्रचार करून सात हजार रुपये सभासदांच्या खिशाला कात्री लावली असे सांगत आहेत. प्रत्यक्षात या कुटुंबांना आधार देण्यासाठी हा निर्णय वार्षिक सभेमध्ये गुरुमाऊली मंडळांने मंजूर करून घेतला होता व त्यानुसारच या कुटुंबांना हा निधी देण्यात आला. ज्या व्यक्तींचा 7 000 मयत निधी या योजनेसाठी वापरला आहे, अशा सभासदांना सेवानिवृत्त होताच हा निधी परत केला जाईल. तसेच मयत निधी दीडशे वरून पाचशे रुपये करण्याचा निर्णय या सभासदांचे कर्ज बार करण्यासाठी घेण्यात आला मात्र विरोधक याचाही अपप्रचार करत आहेत. या मृत्यूमुखी पावलेल्या सभासदांचे सर्व कर्ज बार झाल्यानंतर पाचशे रुपयावरून मयत निधी दीडशे रुपये करण्यात येईल असे सुतोवाच त्यांनी केले.
सभासदांना गेल्या वीस वर्षातील उच्चांकी 10.10% डिव्हीडंड दिला. कायम ठेवीवर इतर ठेवीदारांप्रमाणे 7 ते 8.25% व्याजदर दिले. त्याचबरोबर कर्ज व्याजदर 11% वरून 8.70 पर्यंत कमी केला हे सर्व निर्णय आमसभेतून घेण्यात आले याचा अभिमान वाटत आहे असे त्यांनी सांगितले. गुरुमाऊली मंडळाला फक्त 1.70% तफावतीने कारभार करता आला याचे श्रेय त्यांनी गुरुमाऊली प्रेमी कार्यकर्ते व संचालकांना दिले. सभासदांनी या सर्व बाबींचा विचार करून आणि सर्व संघटनांचे जाहीरनामे पाहून निश्चितच गुरुमाऊली मंडळ, शिक्षक एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बँक व विकास मंडळाची उमेदवारी देताना नेत्यांना व नातेवाईकांना उमेदवारी न देता सर्व समावेशक घटकांना व संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांनी ज्याप्रमाणे सर्व समाज घटकांची उन्नती केली, त्याप्रमाणे आणखी व्याजदर कमी करून सर्व सभासदांचे हित आगामी काळातही आघाडी तर्फे जोपासले जाईल याची ग्वाही त्यांनी दिली. विकास मंडळाच्या जागेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून शिक्षक व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल सेवा उपलब्ध करून देता येईल, त्या दृष्टीने प्लॅन तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सभासदांना व संघटनांना विश्वासात घेऊनच विकास मंडळाचे काम केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. काही मंडळांनी ज्यांचे सेवेत पाच वर्षे शिल्लक नाहीत अशांना उमेदवारी दिली आहे, त्यांना पुढील निवडणुकीत कोण जाब विचारू शकणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना निवडून देऊन उपयोग होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राज्य नेते श्री किसनराव वराट, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री दिगंबर पवार, विकास मंडळाचे विश्वस्त श्री गोकुळ गायकवाड, जिल्हा नेते व मार्गदर्शक श्री केशव गायकवाड, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष श्री जालिंदर भोगल, जिल्हा उपाध्यक्ष श्री विनोद सोनवणे, उच्च अधिकार समितीचे उपाध्यक्ष श्री माजीद शेख, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य श्री विकास बगाडे, जामखेड तालुक्याचे शिक्षक बँकेचे उमेदवार श्री संतोषकुमार किसन राऊत व विकास मंडळाचे उमेदवार श्री मुकुंदराज दशरथ सातपुते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री एकनाथ (दादा) चव्हाण, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग लक्ष्मण मोहळकर, तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री रामहरी बांगर, तालुका उपाध्यक्ष श्री नानासाहेब मोरे, तालुका उपाध्यक्ष श्री सुधीर कांबळे, प्रसिद्धीप्रमुख श्री राजू मडके हे उपस्थित होते.