जामखेड न्युज——
कोणासमोर झुकणार नाही, 2024 च्या तयारीला लागा – पंकजा मुंडे
मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता कोणताही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा मुंडे बोलत होत्या.

कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही
माझे लोक म्हणजे समुद्र आहे. समुद्राला बांधणे शक्य नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. जर कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. लोकांना प्रेम नाही दिलं तर खुर्च्या रिकाम्या राहतील. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. देवेंद्र फडणवीसांनी 2019 मध्ये महाजनादेश यात्रा काढली होती, त्यावेळी सभा घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरले. आता हे लोक माझी ताकद वाढवण्यासाठी आले आहेत. ज्या मुशीतून आमचे नेते आले त्याच मुशीतून मी आले आहे. आमच्यात व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन हेच श्रेष्ठ असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका
आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या. मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष आला आहे. योग्य वेळेची वाट बघा असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमान आहे. मी तुम्हाला असत्य कधीही बोलणार नाही. सत्य अस्वस्थ होत पण पराजित होत नाही असेही त्या म्हणाल्या.

मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही
आता मी 2024 ला पक्षाने तिकीट दिल तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही कमळाशिवाय दुसऱ्या बोटाला कधीही स्पर्श केला नाही, हे सांगताना पंकजा भावनिक झाल्याचे पाहायला मिळालं. मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही. मी कधीही उतरणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही. मी तुमच्यासोबत काम करणार आहे. आपण आपलं काम करणार आहोत आता पदाची अपेक्षा करु नका असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी खासदार प्रितम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे, हभप राधाताई सानप,आमदार मोनिका राजळे, महादेव जानकर, आमदार सुरेश धस, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भीमराव धोंडे, फुलचंद कराड, वसंत मुंडे, डॉ. भगवानराव मुरूमकर, संतोष गव्हाळे सह नगर बीड सह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.





