जामखेड न्युज——
दत्तवाडी शाळेत आजी-आजोबा मेळावा उत्साहात संपन्न
नातवंडांनी रंगवलेली शाळा व केलेले पूजन पाहून आजी-आजोबांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांची प्रमुख उपस्थितीत, श्यामची आई’ कथाकथनाचे सादरीकरण
जामखेडता लुक्यातील धोंडपारगाव येथील आदर्श जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथे रविवार दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी आजी-आजोबा मेळावा विविध नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. शेवगाव तालुक्यातील संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय गोळेगाव येथील अध्यापक श्री रविंद्र गोल्हार यांनी ‘श्यामची आई’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित विविध भावपूर्ण प्रसंगांचे साभिनय व प्रभावी सादरीकरण केले. पूज्य साने गुरुजींच्या सिद्धहस्त लेखणीतून मागील शतकात साकारलेल्या ‘श्यामच्या आईची’ आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातदेखील संस्कारसंपन्न पिढी निर्माण होण्यासाठी नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गोपाळवाडी ता.राहुरी येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)चे राज्य सहसंयोजक श्री.नारायण मंगलारम यांनी प्रमुख अतिथी म्हणून सहकुटुंब उपस्थित राहून अनमोल मार्गदर्शन केले .आजी व आजोबा हे कुटुंब व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक असूनही सध्या दुर्लक्षित ठरत चाललेल्या काळात त्यांना पत्रलेखनातून साद घालत व सन्मानपूर्वक निमंत्रित करून नातवंडांकरवी पूजन करत अनोखी कृतज्ञता व्यक्त करणा-या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने आपण भारावून गेल्याची भावना मंगलारम यांनी व्यक्त केली.
यावेळी आयुश शिंदे, विराज जेधे, सर्वेश येवले,शिवांश पवार, हर्षवर्धन धुमाळ,आशिता सोनवणे, अनुष्का लोहार,सोहम शिंदे, साईराज शिंदे,सई झांजे,शंभूराज शिंदे, भागवत कुमटकर,आदित्य घोडेस्वार या विद्यार्थ्यांनी आपापल्या आजी-आजोबांस लिहिलेल्या भावनिक पत्राचे प्रकटवाचन केले.सर्वच विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांतून शालेय आजी-आजोबा मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी केलेला लडिवाळ हट्ट , आजी व आजोबांचे मिळालेले प्रेम,आजारपणात काळजी घेण्याचे केलेले आवाहन,त्यांची सेवा करणार असल्याचा संकल्प व भविष्यात मोठेपणी आपण कोण बनणार याचे स्वप्न या बाबी अधोरेखित होत होत्या.विशेषत: हर्षवर्धन सुशीलकुमार धुमाळ या इयत्ता २ रीच्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या ‘प्रिय स्वर्गीय आजोबांस…..’ या पत्राच्या प्रकटवाचन प्रसंगी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते.
सर्व विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांतील आशय व सुंदर हस्ताक्षरे पाहून तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी सातत्याने संपन्न होत असलेले शाळेचे विविध प्रेरणादायी उपक्रम पाहून आपण प्रभावित झाल्याची भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष धोंडपारगावचे सुपुत्र तथा स्वामी विवेकानंद माध्य.विद्यालय अंतरवली ता.भूम येथील अध्यापक श्री. दत्तात्रय धुमाळ यांनी व्यक्त केली.
यावेळी कु.अर्पिता महादेव हजारे या इ.५वीच्या विद्यार्थीनीने संत एकनाथ महाराज लिखित ‘दादला नको गं बाई ‘ हे तुफान विनोदी भारूड सादर करून सर्वांची मने जिंकली. भारूडासाठी इ.४थी व ५वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच धोंडपारगावच्या भजनी मंडळाने विशेष साथ दिली.
याच कार्यक्रमात अमृता शिंदे,प्रेमराज शिंदे,उत्कर्षा धुमाळ, रेश्मा राळेभात व वैष्णवी कुमटकर या माजी विद्यार्थ्यांचा इ.८वी NMMS(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षा २०२२ मध्ये सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्याबद्दल तर स्वतः हार्मोनियम वाजवत ‘टाळ बोले चिपळीला’ या अभंगाचे अप्रतिम गायन करत सर्वांना मंत्रमुग्ध केलेल्या शिवांश संतोष पवार या इ.२री च्या विद्यार्थ्याचा गांधर्व महाविद्यालय मिरजच्या वतीने घेण्यात आलेल्या गायन प्रारंभिक परीक्षेमधील यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
मागील आठवड्यात शालेय संरक्षक भिंत व सभागृहातील बैठक कट्टे यांचे अप्रतिम रंगकाम इ.1ली ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले होते.जळगाव जिल्ह्यातील विवेकानंद माध्य.विद्यालय चोपडा येथील कलाध्यापक श्री.राकेश विसपुते यांचे मार्गदर्शनाने हे रंगकाम मुलांनी अत्यंत उत्साहाने केले होते. रोज घरी आई-वडील व आजी-आजोबांना मुले त्यांनी केलेल्या रंगकामाबद्दल आवडीने सांगत असत. माता पालक तसेच शिक्षक-पालक मेळाव्यांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे आई व वडील शाळेत नेहमीच येतात. परंतु आपणास शाळेत येण्याची आंतरिक इच्छा असूनही न येण्याबद्दलची खंत ते नातवंडांजवळ व्यक्त करत असत.त्यांच्या या सूप्त इच्छेला आनंददायी असे मूर्त स्वरूप देण्यासाठीच आजी-आजोबा मेळावा व पूजन घेण्याची संकल्पना आपणास सूचल्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोहर इनामदार यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.
आपल्या नातवंडांनी चिमुकल्या हातांनी स्वतः रंगविलेली शाळा व मेळाव्यात केलेले पूजन पाहून आजी-आजोबा भावूक झाले व त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत जीवनात झालेल्या पहिल्याच सार्वजनिक पूजनाबद्दलच्या समाधानाची व कृतकृत्यतेची भावना व्यक्त दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन काकडेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय जेधे यांनी तर आभारप्रदर्शन खुंटेवाडी शाळेचे उपाध्यापक व सध्या दत्तवाडी शाळेत प्रतिनियुक्तीवर असलेले उपक्रमशील शिक्षक श्री.योगेश तुपविहिरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्याच अशा भव्य आजी-आजोबा मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शिक्षकवृंदांसह शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व माता पालक संघातील सर्व सदस्या तसेच शाळेचे आजी -माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मंडळ धोंडपारगाव यांनी विशेष परिश्रम घेतल्याची प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुशिलकुमार धुमाळ व उपाध्यक्ष श्री.मारूती सराफ यांनी व्यक्त केली.