Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये जनावरे लंपी स्किन आजाराने त्रस्त आजारापासून जनावरांची योग्य काळजी घ्यावी...

जामखेडमध्ये जनावरे लंपी स्किन आजाराने त्रस्त आजारापासून जनावरांची योग्य काळजी घ्यावी – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
409

जामखेड न्युज——

तालुक्यातील काही गावातील जनावरांना अज्ञात रोगाची लागण होत असून हा लम्पी स्किन डिसीज (त्वचारोग) आहे. अचानक ताप व त्वचेवर गाठी येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. मोहरी, गवळवाडी, लोणी आणि जवळा आदी गावात या लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे आहेत. या गावातील संशयित जनावरांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले असून त्यापैकी मोहरी येथील नमुना पोजिटीव्ह आला आहे. अशा जनावरांना विविध औषधापचार दिले जात आहे, असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहायक गटविकास अधिकारी दयानंद पवार व पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड यांनी सांगितले.

लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात तीस टक्के, म्हैसमध्ये १.६ टक्के तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते. या आजारात मृत्यू दर १-५% पर्यंत आढळून येतो. दुग्धउत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.

असा होतो रोगप्रसार- या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.

ही आहेत लक्षणे आहेत- या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथीना सूज येते. साधारणपणे एक आठवडाभर भरपूर ताप येतो. त्वचेवर हळूहळू १०-५० मि.मी. व्यासाच्या गाठी येतात. या प्रामुख्याने डोके, मान, पाय, मान, कास भागात येतो.

रोगनियंत्रण- लम्पी आजार झालेल्या जनावरांना वेगळे करावे, तसेच बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नयेत. जनावरांची बाधित भागातून ने-आण बंद करावी, रोग नियंत्रणासाठी माशा, डास व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करण्यात यावे. कीटकनाशक औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठयात फवारा मारावा. ग्रामपंचायत कडून सर्व गावात फवारणी चालू आहे. गावागावात जनजागृती चालू आहे असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.

-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!