जामखेड न्युज——
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणात समोरासमोर चार पॅनल उभे आहेत. बँकेसाठी चौरंगी लढत होत असून आज अर्ज माघारीची शेवटचा दिवस होता.

१)गुरुमाऊली ( रावसाहेब रोहकले गट)
२)गुरुमाऊली ( बापू तांबे गट ) ,शिक्षक भारती, ऐक्य
३) गुरुकुल व स्वराज्य
४) सदिच्छा , इब्टा व इतर काही
अशी चौरंगी लढत होत असल्याची माहिती आहे.याशिवाय काही अपक्ष ही रणांगणात आहेत.शिक्षक बँकेसाठी रविवार २४ जुलै रोजी दिवशी मतदान होत असून ,मतमोजणी २५ जुलैला होणार आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येक मंडळाकडून अनेक इच्छुक होते.त्यांची उमेदवारी नाकारताना ते नाराज होत होते.

त्यामुळे त्यांची मनधरणी करता करता श्रेष्टींच्या नाकेनऊ आल्या होत्या .उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी श्रेष्टींवर तोंड सुख घेत बंडाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नाराजांची मनधरणी करण्यात घालवावे लागणार आहे.अनेक मंडळांनी तर अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांना काल रात्रीपासूनच ताब्यात ठेवले होते.इच्छुक उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी काही शिक्षकांची खास नेमणूक करण्यात आली होती. चौरंगी लढतीमुळे बँकेसाठी काट्याची टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे.
21 जागांसाठी निवडणूक
शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणुक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण 16 जागा आहेत. त्यातील 14 जागा या प्रत्येक तालुक्यामधून 1 प्रतिनिधी अशा आहेत तर 2 जागा मनपा, नगरपालिका, भिंगार कॅन्टोन्मेंट, केंद्र प्रमुख, नॉनटिचींग मधून भरल्या जाणार आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 1, सर्वसाधारण महिला प्रतिनिधीसाठी 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधीसाठी 1, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गासाठी 1 अशा एकूण 21 जागा आहेत.
तालुकानिहाय मतदारांची संख्या
संगमनेर 1059, नगर 772, पारनेर 851, कोपरगाव 573, श्रीरामपूर 465, जामखेड 439, पाथर्डी 750, राहुरी 781, शेवगाव 667, श्रीगोंदा 955, अकोले 1018, नेवासा 908, कर्जत 687, राहाता-कोपरगाव 299, राहाता-श्रीरामपूर 240, मनपा-नगर पालिका 188, भिंगार 18, केंद्र प्रमुख 60, नॉन टिचिंग 33, एकूण 10 हजार 464 मतदार असे आहेत.