जामखेड न्युज——
विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट युतीच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विजय मिळवला. तर रात्री उशिरा विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि प्रतोदपदी भरत गोगावले (Bharat gogawale) यांचीच नियुक्ती वैध ठरवली. या निर्णयामुळं शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

२२ जून रोजी विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्रानुसार ठराव पाठवला होता. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवून अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. ती रद्द करुन एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आलेली गटनेते पदाची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर, भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असं विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे आणि भरतशेठ गोगावले यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये संघर्षाची नांदी झाली आहे. एकनाथ शिंदे हे गटनेते व भरत गोगावले हे पक्षाचे प्रतोद आहेत. त्यामुळं त्यांनी जाहीर केलेले व्हिप पाळणं आदित्य ठाकरेंसह इतर शिवसेनेच्या १६ आमदारांना बंधनकारक आहे. अन्यथा या १६ आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. अशावेळी शिवसेनेतील १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.