जामखेड न्युज – – –
राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेतही पराभवाचा धक्का बसलेल्या महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ११ आमदार नॉटरिचेबल असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. पण आता नाराज असलेले एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह गुजरातमध्ये गेले आहेत.
यामुळे महाराष्ट्रात नेमका काय भुकंप होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे उघड झाले आहे. एवढेच नाही तर गुजरात पोलिसांनी या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसेच त्यानंतर हे नेते अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही आमदार विजयी झाले असले तरी पक्षाची जवळपास १२ मतं फुटली असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार उपस्थित नसल्याने खळबळ उडाली आहे.
संपर्कात नसलेल्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्री दोन वाजेपर्यंत वर्षावर बैठक सुरू होती, अशीही माहिती मिळते आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांची मंगळवारी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले.




