जामखेड न्युज – – – – –
दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी वारीला (Ashadhi Ekadashi 2022) विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. महिनाभर आधीपासूनच तयारीला लागणाऱ्या प्रशासनाला चोरट्यांनी दणका दिला असून वाखरी येथील सर्वात मोठ्या पालखी तळावर वारकऱ्यांसाठी असलेल्या 100 पेक्षा जास्त स्वच्छतागृहांची दारंच चोरट्यांनी पळवल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वाखरी येथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका यांच्यासह अनेक मानाच्या पालख्यांचा अखेरचा मुक्काम असल्यानं येथे जवळपास 10 लाख भाविक मुक्कामाला असतात. या भाविकांची सोय होण्यासाठी येथे जवळपास 750 पक्की स्वच्छतागृहं उभारण्यात आलेली आहेत. मात्र प्रशासन वारकऱ्यांच्या सुविधेची तयारी करत असताना अज्ञात चोरट्यांनी जवळपास 100 स्वच्छतागृहांची लोखंडी दारं गॅस कटरच्या सहाय्यानं कापून नेल्यानं आता याची पुन्हा नव्यानं उभारणी करावी लागणार आहे. एका बाजूला नवीन चार पदरी रस्त्यामुळं पालखी मार्गावर अनेक अडचणी सोडवताना प्रशासन मेटाकुटीला आलं आहे. यातच आता वारकऱ्यांच्या स्वच्छतागृहांच्या दारांची चोरी झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनामुळे (Covid-19) 2 वर्ष पालखी सोहळा झाला नव्हता. संख्या खूप जास्त होणार असल्याने तयारी सुरू झाली आहे. अशातच वाखरीतील 100 हून अधिक स्वच्छतागृहांची दारंच चोरट्यांनी पळवल्यानं प्रशासन हतबल झालं आहे. चोरट्यांनी स्वच्छतागृहांची लोखंडी दारं गॅस कटरच्या सहाय्यानं कापून नेली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्वच्छतागृहांची दारं प्रशासनाला उभारावी लागणार आहेत. वेळ आणि खर्च दोन्हीचा फटका प्रशासनाला भोगावा लागणा आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं पायी वारीत खंड पडला होता. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे वारकऱ्यांमध्ये तब्बल दोन वर्षांनी होणाऱ्या निर्बंधमुक्त वारीबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
15 लाख वारकरी वारीत सहभागी होण्याचा अंदाज, पालकमंत्र्यांची माहिती
कोरोनाच्या नियमाच्या बांधनातून मुक्त यंदाची वारी होणार आहे. दरवेळी पेक्षा जास्त वारकरी येणार या दृष्टीनं नियोजन केलं जात आहे. वारी संदर्भात झालेल्या नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. दरवेळी 10 ते 12 लाख वारकरी पंढरपूरात येतं असतात. यंदा 15 लाख वारकरी येऊ शकतील या अंदाजानं नियोजन केलं जात आहे.