लग्नाचा पूर्ण खर्च मुलीकडच्यांनी करणं हुंडा आहे का? पुरोगामी महाराष्ट्राला हुंड्याची कीड

0
306
जामखेड न्युज – – – – 
.
“माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणात मुलीकडच्यांनी लग्नासाठी 35 ते 40 लाख रुपये खर्च केला. कारण मुलीच्या सासरकडच्यांची तशी अपेक्षा होती. महाराष्ट्रात अनेक भागात मुलाच्या हुद्यानुसार प्रतिष्ठित लग्न लावून द्यावं अशी अपेक्षा सासरकडच्यांची मुलीच्या कुटुंबाकडून असते आणि त्यासाठी मुलीचे वडील लग्नाचा खर्च उचलण्यासाठी अगदी कर्ज सुद्धा काढतात,” हुंड्याची प्रकरणं हाताळणारे वकील वनराज पवार बोलताना सांगितलं. पुरोगामी महाराष्ट्राला हुंड्याची कीड लागली आहे. सुशिक्षित लोक तर जास्तच पैसे किंवा वस्तूंची मागणी करतात.
                             ADVERTISEMENT           
हल्ली हुंडा घेतला जात नाही किंवा दिलाही जात नाही असा सर्वसाधारण समज असला तरी महाराष्ट्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या मार्गांनी हुंडा घेतला जातो आणि दिलाही जातो. तसंच अनेकवेळेला आपण हुंडा देतोय किंवा घेतोय याचीही कल्पना लोकांना नसते इतक्या ह्या गोष्टी सामान्य झाल्या आहेत असं कायद्याचे जाणकार सांगतात.
जागतिक बँकेच्या अभ्यासकांनी 2021 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणातही असं दिसून आलं आहे की, भारतात लग्नात वधूपक्ष वरपक्षापेक्षा सातपट अधिक खर्च करतो.
महाराष्ट्रात कोणकोणत्या अशा मार्गांनी हुंडा घेतला जातो? लग्नाचा पूर्ण खर्च मुलीच्या कुटुंबाने करणं हुंडा आहे का? मुलाच्या हुद्द्यानुसार हुंड्याचे दर ठरतात का? हुंडा प्रतिबंधक कायदा याविषयी काय सांगतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
कोणकोणत्या मार्गाने हुंडा घेतला जातो?
महाराष्ट्रात हुंडा घेणं कधीही थांबलं नव्हतं आणि आता केवळ त्याचं स्वरूप बदललं आहे असं कायदेतज्ज्ञ सांगतात. वधू आणि वर किंवा इतर कुणाकडूनही कोणत्याही स्वरूपात हुंडा मागू किंवा घेऊ नये असं हुंडा प्रतिबंधक कायद्यात म्हटलेलं आहे.
‘हुंडाबंदी कायद्यानंतरही भारतात 95% लग्नांमध्ये हुंडा घेतला जातो’
हुंडा प्रतिबंधक कायद्यात सुप्रीम कोर्टानं केला बदल
कौमार्य परीक्षेत नापास झाल्याचं सांगत दोन सख्ख्या बहिणींना माहेरी पाठवलं
हुंड्यासाठी पत्नीचा किंवा सूनेचा छळ केला, हुंड्यासाठी छळ होत असल्याने पत्नीनं आत्महत्या केली, हुंड्यामुळे लग्न मोडलं अशा अनेक घटना आजही देशभरात विविध भागात सुरू आहेत. पण याशिवाय आजही लग्न ठरवताना ‘परंपरा’ म्हणून किंवा ‘लग्न ठरवण्याची आमच्याकडे हीच पद्धत आहे,’ असं म्हणत वेगवेगळ्या मार्गाने हुंडा घेतला जातो असं कायदेतज्ज्ञ सांगतात.
हुंड्यासंबंधी प्रकरणं हाताळणाऱ्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार हुंडा मागण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत ते पाहूयात –
1. मुलीला किती तोळे सोनं देणार? यावर लग्न ठरवणे. अपेक्षित सोनं मुलीकडून येणार नसल्यास लग्नास नकार देणे किंवा लग्न मोडणे.
2. लग्न थाटामाटात भव्य स्वरुपात करण्याची मागणी करून त्यासाठी संपूर्ण खर्च केवळ मुलीच्या कुटुंबाला करण्यास भाग पाडणे किंवा त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांना करायला लावणे.
3. मोठमोठ्या भेटवस्तूंची मागणी करणे. उदाहरणार्थ, कार, टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन, ओव्हन, नोकरी लावण्यासाठी देण्यात येणार डोनेशन इत्यादी.
4. मुलाच्या हुद्यानुसार हुंड्याची मागणी करणे.
5. मुलाच्या वरातीचा खर्च, डीजे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची अपेक्षा आणि त्याचा खर्च करण्यास बळजबरी करणे.
6. जमीन किंवा घर खरेदीसाठी आग्रह करणे.
वकील असीम सरोदे सांगतात, “या सर्व गोष्टी एकमेकांच्या संमतीने ठरवल्या आहेत आणि त्यानुसार आम्हाला एवढा खर्च करण्यास हरकत नाही असं दाखवलं जातं. पण प्रत्यक्षात अनेक केसेसमध्ये वास्तव हे नसतं. अनेकदा मुलीच्या कुटुंबाला नाईलाजाने लग्न मोडू नये म्हणूनही हा खर्च करावा लागतो. तसंच वस्तूंच्या स्वरूपात हुंडा दिला जातो याला रुखवत म्हटलं जातं. यापूर्वी टेबल-खुर्च्या, कपाट अशा भेटवस्तू दिल्या जात होत्या. आता फ्रिज, मशीन, ओव्हन अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या जातात.”
हुंडा
ते पुढे सांगतात, “कुणाच्या इच्छेविरोधात लग्न करून देण्यासाठी जी काही मागणी केली जाते अशा सर्व गोष्टी हुंडा ठरतात. यात लग्न करून देणे म्हणजे लग्नाचा खर्च केवळ वधूपक्षाने उचलावा या अटीचाही समावेश आहे आणि म्हणून मुलीकडच्यांना लग्नाचा खर्च उचलण्यास भाग पाडणं हा एक प्रकारचा हुंडाच आहे. यासंदर्भात तक्रार झाल्यास हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते.”
हुंड्याच्या प्रकरणांचे वकील वनराज पवार सुद्धा हेच सांगतात, “माझ्याकडे आलेल्या अनेक प्रकरणांमध्ये मुलीकडच्यांनी लग्नाचा पूर्ण खर्च करून द्यावा अशी मागणी केलेली आहे. पण लग्न समारंभात शेकडो लोकांना बोलवलं जातं, एवढ्या माणसांच्या जेवणाचा, मानपानाचा खर्च मुलीच्या कुटुंबाला परवडणार आहे का हे सुद्धा पाहिलं जात नाही. तो खर्च वधूपक्षाला करावाच लागतो.”
“मुलीच्या वडिलांना असं वाटतं की ते केवळ लग्नाचा खर्च करून मागत आहेत. पण तसं नसतं. त्यात भेटवस्तूंची अपेक्षा असते. काही ठिकाणी भेटवस्तू समोरून मागितल्याही जातात, ज्यात गाडी, फ्रीज, एसी, पलंग, भांडी, कपाट अशा अनेक वस्तूंचा समावेश असतो.”
पण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्ष लग्न समारंभ करण्याच्या पद्धती आहेत आणि प्रत्येक समाजात परंपरेनुसार लग्नाचे सर्व कार्यक्रम केले जातात.
सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील वर्षा देशपांडे म्हणाल्या, “अनेक ठिकाणी परंपरेच्या नावाखाली हुंड्यासाठी मुलीचा छळ केला जातो. म्हणूनच आजही आपल्याला अशा घटना दिसतात. व्यापाऱ्यांनी हुंड्यांचा बाजार केला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात तुम्हाला लग्नात मुलीला द्यायच्या भांड्यांची दुकानं दिसतील. या दुकानांमध्ये लग्नात मुलींना देण्यासाठी भांड्यांचा सेट तयार मिळतो. हा भांड्यांचा ‘संसार’ म्हणून एखादी प्रथा असल्याप्रमाणे दिला जातो,” असं वकील वर्षा देशपांडे सांगतात.
“आपल्याकडे मुलीला सोनं स्त्री-धन म्हणून दिलं जातं. अनेक मुलींनाही त्याची हौस असते. पण सासरी गेल्यावर स्त्री-धन म्हणून दिलेलं सोनंही अनेक सुनांना दिलं जात नाही. आमच्याकडे जेव्हा हुंड्याची केस येते किंवा पती-पत्नीत वादाची प्रकरणं समोर येतात तेव्हा मुलीला दिलेलं सोनंही सासरकडचे तिला परत देत नाहीत. आम्हाला त्यासाठीही कोर्टात जावं लागतं,” असं वनराज पवार सांगतात.
मुलाच्या हुद्यानुसार हुंड्याचा दर ठरतो?
महाराष्ट्रात हुंडा घेण्याचा आणखी एक ‘ट्रेंड’ दिसतो असंही कायदेतज्ज्ञ सांगतात. हा ‘ट्रेंड’ आहे मुलाच्या हुद्यानुसार हुंडा ठरवणे.
म्हणजे काय? तर मुलगा काय काम करतो, त्याचं शिक्षण किती झालं आहे, त्याचा पगार किती यानुसार हुंड्याचे दर ठरतात असंही वकील सांगतात.
लग्न
मुलगा डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सरकारी नोकरदार असल्यास मुलाचा हुद्दा सांगून लग्नात वधूपक्षावर दबाव आणला जातो असं वकील वनराज पवार म्हणाले.
“मुलाच्या हुद्यानुसार हुंड्याचे दर आहेत. समाजात जो हुद्दा मोठा मानला जातो तेवढं ‘मोठं लग्न’ करून देण्याची सासरकडच्यांची अपेक्षा असते. किंबहूना हुद्यानुसार हुंड्याचे दर ठरलेले असतात. आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनीअर आहे, शिक्षक आहे, प्रशासकीय अधिकारी आहे त्यामुळे त्यानुसार थाटामाटात लग्न झालं पाहिजे. लग्नात शेकडो लोकांच्या जेवणाचा खर्च तुम्ही पूर्ण करा अशीही मागणी केली जाते,” असं ते म्हणाले.
असीम सरोदे सुद्धा हे मान्य करतात की मुलाच्या प्रोफेशननुसार हुंडा घेतला जातो. खरं तर अशा सर्व संशयित घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी हुंडा प्रतिबंधक अधिकारी नेमले पाहिजे असं कायद्यात म्हटलं आहे.
“हुंडा प्रतिबंधक अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात नेमले पाहिजेत. या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लग्न कार्यक्रमांना भेट देणं अपेक्षित आहे, लग्नाच्या खर्चाची दखल घेणं अपेक्षित आहे. लग्नात किती लोकांना बोलवलं आहे, त्यासाठी किती खर्च झालाय, याचा लेखाजोखा मांडण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना दिला आहे. पण मुळात असे अधिकारी नेमलेलेच नाहीत. तसंच काही ठिकाणी अधिकाऱ्यांची मानसिकता सुद्धा परंपरावादी असल्याने अशा कृतींकडे कानाडोळा केला जातो.”
यात एक अडचण अशी आहे की मर्जीने या गोष्टी सुरू असल्याचं दाखवण्यात येतं. त्यामुळे बाकी कोणालाही यात काही बोलता येत नाही आणि अशा केसेसची नोंद होत नाही असंही असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं.
अशा वेगवेगळ्या मार्गाने हुंडा घेतला जातो आणि बहुतांश प्रकरणांमध्ये मुलीच्या कुटुंबालाच हे सोसावं लागतं असं वर्षा देशपाडे म्हणाल्या. ग्रामीण भागात तर हुंड्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळेच अनेकजण कर्जबाजारी होतात असंही वर्षा देशपांडे यांना वाटतं.
“मला वाटतं आता शिकलेल्या मुलींनी तरी ही जबाबदारी घ्यायला हवी की हुंड्याची तक्रार वेळीच करावी. लव्ह मॅरेज जरी असलं तरी हुंड्यासाठी दबावाला बळी पडू नये. लग्न ठरवताना मुलींनी त्या प्रक्रियेत पुढाकार घेऊन या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि काही चुकीचं आढळल्यास त्यास विधायक मार्गाने विरोधही केला पाहेजे.” असा सल्ला वर्षा देशपांडे देतात.
हुंडा प्रतिबंधक कायदा काय सांगतो?
कुटुंबातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं एक कारण हुंडा आहे आणि त्याविरोधात पावलं उचलण्यासाठी ‘हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अस्तित्वात आला.
लग्न, हुंडा
हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू , स्थावर, जंगम मालमत्ता देणे अगर देण्याचे कबूल करणे. पैसे, दागिने, करार, जमीन, सोनं कुठल्याही स्वरूपात देवाण-घेवाण असल्यास हुंडा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो.
हुंडा प्रतिबंध कायद्यात 10 कलमं साधारण आहेत. 498 अ अंतर्गत हुंडासंबंधी सर्व प्रकरणांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाते.
एखाद्या महिलेचा हुंड्यासाठी तिच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक किंवा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जात असेल तर 498-अ या कलमाअंतर्गत कारवाई होते.
498-अ अंतर्गत 7 वर्षांच्या आत कोणत्याही कारणासाठी विवाहित महिलेची आत्महत्या झाल्यास तो दखलपत्र गुन्हा ठरू शकतो. यात हुंड्यासाठी छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणं, याचा समावेश आहे.
हुंडा प्रतिबंधक कायद्यात दोषी आढळल्यास तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे लग्नाआधी, लग्नानंतर किंवा लग्नात मुलीच्या माहेरच्यांकडून घेतलेला कोणत्याही प्रकारचा हुंडा ग्राह्य धरला जाऊ शकतो. हुंड्यासंबंधी तक्रार असल्यास पोलीस किंवा मॅजिस्ट्रेटकडे करू शकतो.
विवाहित महिलेला हुंड्यासाठी त्रास दिल्यास ती स्वत: तक्रार करू शकते. यात नवऱ्यावर कारवाई केली जाईलच असे नाही. अनेकदा पत्नीला भीती असते की तिने कोणाचीही तक्रार केल्यास कारवाई नवऱ्यावर होईल पण तसे नाही. हुंड्यासाठी जो भाग पाडतो त्याच्या विरोधात कारवाई होते असं कायदेतज्ज्ञ सांगतात.
95 टक्के लग्नांमध्ये मुली हुंडा देतात?
जागतिक बँकेच्या एका अभ्यासात दिसून आलंय की लग्नात मुलीच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याची पद्धत भारतात अजूनही कायम आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये या रूढीला छेद गेलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here