Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या मेडिकलला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाखाला गंडविले दोघांवर गुन्हा दाखल

मेडिकलला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाखाला गंडविले दोघांवर गुन्हा दाखल

0
257
जामखेड न्युज – – – – 
नीट’ परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी तिच्या पालकांकडून १४ लाख रुपये उकळले. मात्र, नंतर महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला नाही आणि रक्कम परत करण्यासही नकार दिल्याच्या आरोपावरून त्या दोन भामट्यांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.याप्रकरणी मनीषा नंदकुमार फड (रा. माधवबाग, परळी) यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे.
                             ADVERTISEMENT
 
सदर फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी गतवर्षी नीट परिक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या वैद्यकीय प्रवेशासाठी कुटुंबीय प्रयत्नात होते. त्या दरम्यान मनीषा यांचे दिर सुनील श्रीरंग फड यांना युवराज सिंग उर्फ सोनू कुमार आणि नितांत गायकवाड (रा. पुणे) या दोघांनी कॉल केला आणि पुण्यात त्यांची कन्सलटन्सी असल्याचे सांगितले. नीट परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही पोंडीचेरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ. त्यासाठी पाच वर्षाच्या खर्चासह ७५ लाख रुपये लागतील असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फड यांनी मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे आणि पहिल्या टप्प्यातील मागणीनुसार एकूण १४ लाख रुपये त्यांना ८ फेब्रुवारी रोजी पाठविले. त्यानंतर २२ मार्च रोजी आणखी ५ लाख रुपये त्या दोघांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये नेऊन दिले. नंतर तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे म्हणून त्यांनी फडकुटुंबियांना पोंडीचेरी येथे बोलावून घेतले. मात्र, तिथे गेल्यानंतर युवराज सिंग याने या कॉलेजचे प्रवेश बंद झाले आहेत असे सांगून इतर कॉलेजमध्ये प्रवेश देतो अशी बतावणी करू लागला. त्याच्या अविर्भावावरून तो फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने फड यांनी आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही, आमचे पैसे परत कर असे त्याला सांगितले. त्यानंतर युवराज सिंगने पाच लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून अद्यापही त्याने ती रक्कम परत केली नाही. अखेर हताश झालेल्या मनीषा फड यांनी पोलीसात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून युवराज सिंग आणि नितांत गायकवाड या दोघांवर संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
मनीषा यांच्या पतीचे निधन झालेले आहे. त्यांना दोन मुली असून त्यांचे शिक्षण सुरु आहे. त्यापैकी एकीने नीट परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मनीषा यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी काबाडकष्ट करून जमा केलेली रक्कम वैद्यकीय प्रवेशासाठी दिली होती. मात्र, भामट्यांनी त्यांची फसवणूक केल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या झाल्या असून मुलीचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. त्यामुळे भामट्यांवर त्वरित कारवाई करून रक्कम परत मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी फिर्यादीतून केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!