सामाजिक बंधनं झुगारुन विधवा भावजयीसोबत दिरानं बांधली लग्नगाठ, समाजातून कौतुकाची थाप

0
273
जामखेड न्युज – – – – 
आपण कितीही पुढारलेलो, टेक्नॉलॉजीने वेढलेलो आणि सामाजिक जाणिवांनी भरलेलो असलो तरी समाजात विधवा (Widow) महिलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मात्र, बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील वानखेडच्या हरिदास दामधर या तरुणाने नेमका हाच दृष्टीकोन बदलत विधवा भावजयीसोबत लग्नगाठ बांधत नवा आदर्श घालून दिलाय. आजारपणामुळे नवऱ्याचा मृत्यू झाला. एक मुलगा आणि लहान मुलगी असलेल्या नंदा दामधरवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशावेळी हरिदास सामाजिक बंधनं झुगारून विधवा भावजयीसोबत लग्न (Marriage) करण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाब म्हणजे कुटुंब आणि समाजातील, आसपासच्या लोकांनीही त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
हरिदास आणि नंदाचे मोठ्या थाटात लग्न
विधवा भावजयीसोबत लग्न करण्याचा निर्णय हरिदासने घेतल्यानंतर कुटुंबाने त्याला मान्यता दिली. लग्न ठरलं. लग्नादिवशी वऱ्हाडी मंडळींनीही टाळ्यांच्या गजरात नव विवाहित दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. आता या नवदाम्पत्याने आपल्या मुलांसह सुखाने संसार करण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी नंदावर अचानकपणे दु:खाचा डोंगर कोसळला. एक मुलगा आणि लहान मुलीचा सांभाळ कसा करायचा असा यक्षप्रश्न तिच्यासमोर होता. अशावेळी नातेवाईक, कुटुंब आणि मित्रांनी हरिदासला समजावून सांगितलं. हरिदासही मोठ्या मनाने आपल्या विधवा भावजयीसोबत लग्न करण्यास तयार झाला. दोघांनीही होकार दिल्यानंतर हरिदास आणि नंदाचे लग्न मोठ्या थाटात लावून देण्यात आलं.
नव दाम्पत्याचे सर्व स्तरातून कौतुक
समाज काय म्हणेल? हा उत्तर नसलेला प्रश्न दामधर कुटुंब, नंदा आणि हरिदासलाही सतावत होता. मात्र, सामाजिक बंधनं झुगारुन आणि नकारात्मकतेची भिंत पाडून हा विवाह सोहळा पार पडला. दोन्ही बाजूचे पाहुणेमंडळी आणि वऱ्हाडी मंडळींनी नवदाम्पत्याला आशीर्वाद आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. या लग्नासाठी नव दाम्पत्याचे आणि खास करुन हरिदासचे समाजातील अनेक स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here