राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी – राजद्रोहाचा गुन्हा

0
204
जामखेड न्युज – – – – – 
 खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. अॅड रिझवान मर्चंट आण अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली.  रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला आणि पोलिस कोठडी देण्यासही विरोध केला.
‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याला रात्रभर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं गेलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here