जामखेड न्युज – – – – –
चैत्र महिन्यात ग्रामीण भागात अनेक गावांत यात्रा उत्सव असतो आणी गावातील ग्रामदैवतास पवित्र गंगा नदीच्या पाण्याचा जलाभिषेक करून यात्रा साजरी केली जाते
गावांमध्ये यात्रा असल्याने ज्योतिबाला जलाभिषेक घालण्यासाठी गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी कवडी घेऊन गेलेल्या दोन तरुणांचं गोदापात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी राजापूर ( ता. गेवराई ) येथे घडली. या घटनेने निपाणी जवळका येथील यात्रेच्या आनंदावर विरजण पडले असून, आनंदाचे वातावरण दुःखात बदललं आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी ज्ञानदेव इंगोले ( वय १८ वर्ष ), मोहन नाना अतकरे ( वय १८ वर्ष ) दोघे रहाणार निपाणी जवळका ( ता. गेवराई ) असे मयत तरुणांची नावं असून, आज निपाणी जवळका येथे प्रतिवर्षाप्रमाणे ज्योतिबाची यात्रा आहे. यात्रेनिमित्त ज्योतिबाला जलाभिषेक घालण्यासाठी कवडी घेऊन हे तरुण राजापूर येथे गोदावरी नदीतून पाणी आणण्यासाठी गेले होते. वाहत पाणी पाहून याना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पोहताना दोघेही नदीपात्रात बुडाले. ते सापडत नसल्याने घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी ही घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. जलाभिषेकासाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी निपाणी जवळका येथे समजताच गावावर शोककळा पसरली असून यात्रेच्या आनंद दुःखात बदललं आहे.