जामखेड न्युज – – – –
बीडच्या (Beed) पाटोदा तालुक्यातील वडझरी गावातील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेतील (Sant Shiromani Bhagwan Baba Primary Ashram School) 7 शिक्षकांना संस्थाचालकांनी पैशांची मागणी केली. शिक्षकांनी पैसे न दिल्याने संस्थेने त्यांना शाळेतून काढून टाकले. सलग पाच वर्ष सेवा दिल्यानंतरही शाळेतून काढून टाकल्यामुळे या शिक्षकांनी थेट न्यायालय आणि मंत्र्यांकडे धाव घेतली. शिक्षकांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची मदत घेतली. वडेट्टीवारांनी शिक्षकांना सेवेत कायम रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मात्र सेवेमध्ये रुजू करून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि संबंधित संस्थाचालक पैसे मागत आहेत. लहान मुलांना घरात खाण्यासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती असताना संस्थाचालकांना पैसे द्यायचे कुठून? आता अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत पीडित शिक्षक लहू दत्तात्रय कन्हेरकर यांनी टाहो फोडला.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या आदेशानंतर शाळेवर रुजू करून घेण्यासाठी संस्थाचालकांकडून आणि समाज कल्याणच्या अधिकार्याकडून पैशांची मागणी केली जातेय, असा गंभीर आरोप निवासी आश्रम शाळा शिक्षकांनी केला आहे. यामुळे बीडच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. लेकराला खाऊ घालायला पैसे नाहीत त्यांना पैशे देऊ कसे? असं म्हणत शिक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले. संस्थाचालक आणि शासनाच्या लाल फितीच्या कारभाराला कंटाळून आत्महत्या करावी का? असा संताप सवाल बीडमधील 7 शिक्षकांनी केला आहे. संस्थाचालकाच्या जाचास कंटाळून शिक्षकाने टाहो फोडल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
संत शिरोमणी भगवान बाबा आश्रम शाळेतील सहशिक्षक राजेंद्र महाजन आणि संदीप महाडिक यांच्यासह इतर पाच जणांना देखील संस्थाचालकाने पैशांची मागणी करत पैसे न दिल्यामुळे शाळेतून काढून टाकले आहे. हे सर्व सहशिक्षक 2004 पासून 2010 पर्यंत शाळेवरती कार्यरत होते. या संस्थेच्या निर्णयाविरोधात या सर्व शिक्षकांनी न्यायालयात आणि मंत्र्यांकडे धाव घेतली. शिक्षक गेल्या नऊ-दहा वर्षांपासून लढा लढत आहेत. त्यांच्या हक्कासाठी त्यांनी निवडलेल्या न्यायालयीन लढाईसाठी त्यांची सर्व जमापुंजी खर्च झालीय. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी देखील त्यांच्याजवळ पैसे नाहीत.
विजय वडेट्टीवारांनी आदेश दिल्यानंतर सातही शिक्षक आणि त्यांच्या घरचे आनंदी झाले होते. मात्र, संस्था त्यांना शाळेत रुजू करून घेण्यासाठी आता पुन्हा पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न या शिक्षकांकडून उपस्थित केला जातोय. जिथे घर चालवण्यासाठी पैसे नाहीत तिथे संस्थाचालकांना कुठून पैसे द्यायचे? असा संतप्त सवाल राजेंद्र महाजन या शिक्षकाने केला.
भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून राज्य शासनातर्फे ही निवासी आश्रम शाळा चालवली जाते. या ठिकाणी यापूर्वी बोगस विद्यार्थी असल्याचं मिडियाने समोर आणलं होत. यानंतर आता संस्थाचालकांचा दुसरा पराक्रम पुढे आल्यामुळे या संस्थेवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. याबाबत संस्थाचालकांशी संपर्क केला असता न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. या बाबतीत मला काही बोलायचं नाही, असं त्यांनी फोनवरून सांगितलं. या प्रकरणावर बीडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी यांना विचारले असता मी कामात आहे, या संदर्भात मला पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी बोलणं टाळलं.