जामखेड न्युज – – – –
न्यायाचा हक्क मागणारे मंदिर समजून न्यायालयात प्रवेश करीत असतात. न्यायाधिशाला लोक जर देव मानतअसतील तर न्यायाधिशांनी देवाला साजेल असे काम केले पाहिजे असे प्रतिपादन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी केले.
जामखेड येथील दिवाणी न्यायालय व कनिष्ठस्तर नुतन इमारतीचे उदघाटन औरंगाबाद खंडपीठाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय मेहेर, जिल्हा न्यायाधीश सुधाकर चार्लगड्डा, जामखेडचे न्यायाधिश आर. जगताप, जामखेड वकील संघाचे अध्यक्ष संग्राम पोले, त्यांचे सर्व सहकारी, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, आ. रोहीत पवार व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी न्यायमूर्ती रवींद्र घुगे म्हणाले गरजु, गोरगरीब लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वकील व न्यायीक कुटूंबाने याकडे लक्ष दिले पाहिजे. उदघाटनानंतर हे न्यायमंदीर असेच स्वच्छ, टापटीप राहील हा प्रश्न आहे. आपण देवळात जातो तेथे तंबाखू, गुटखा खाऊन कोणी पिचका-या मारीत नाही तसेच या न्यायमंदीराचे पावित्र्य राखावे आ. रोहीत पवार यांनी या नवीन इमारतीसाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी दिला आहे. त्यामुळे त्यांनी महिन्यातून एकदा का होईना वकीलासमवेत भेट देऊन हा परिसर सुंदर राहील हे पहावे त्यांना अस्वच्छता दिसल्यास त्यांनी रागवावे हा त्यांचा अधिकार असल्याचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे म्हणाले.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय मेहेर म्हणाले, जामखेड येथील झालेल्या इमारतीला उच्च न्यायालयाच्या इमारती सारखा लुक आला आहे. वकीलांनी सामाजिक दायित्व स्विकारून गोरगरीब व शक्ती कमी आहे अशा लोकांना मदत करावी असा त्याचा हेतु आहे. त्यांनी इमारत सुसज्ज झाली म्हणून फी वाढ करू नये. न्यायदान जलद होण्यासाठी जे घटक आहेत त्यांनी आपला कार्यभार लवकर पार पाडावा त्यामुळे न्याय लवकर होईल. या इमारतीचे दिमाखदार लुक राहण्यासाठी वकील व प्रशासकीय स्टाफ यांनी निगा राखावी असे आवाहन न्यायमूर्ती संजय मेहेर यांनी केले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश सुधाकर चार्लगड्डा यांनी मार्गदर्शन केले. आभार जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश आर. जगताप यांनी मानले.