जामखेड न्युज – – – –
भाजप आमदार नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे हे पुन्हा एकदा नव्या अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेले बेच्छुट आरोप त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहीमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी राणे बंधुंवर गुन्हा दाखल केला आहे.
आधीच संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्या पाय खोलात गेले आहे. त्यातच अधीश बंगल्यावरील कारवाईची टांगती तलवार आणि त्यानंतर आता नव्याने पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत आणखीच भर पडण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते निलेश राणे?
निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर टीकेचा भडिमार केला होता. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाही, काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस आहेत असा मला संशय आहे, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं.
दरम्यान, याच कारणावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणात आता पोलीस या दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.