मिरजगावसाठी आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय मंजूर; 13.64 कोटींच्या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता!

0
217
जामखेड न्युज – – – 
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यातच कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे रोहितदादांनी राज्य सरकारतर्फे नवीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आहे. तसेच मिरजगावच्या नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून व मिरजकरांचा कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा त्रास वाचावा या उद्देशाने आमदार रोहित पवार या रुग्णालयासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य सरकारच्या निधीतून मिरजगाव येथील महामार्गाशेजारीच या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे.
आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा वेळोवेळी लावून धरला होता. तसेच याकडे त्यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घातलं होतं. त्यानुसार आता मिरजगावमधील नागरिकांसाठी एकूण 50 खाटांचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. शासनाकडे या उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेचा 13.64 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आता 13.64 कोटी रुपयांचे अत्याधुनिक व सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मिरजगावमध्ये उभारले जाणार आहे.
मिरजगाव जवळून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अनेक लोकांनी या भागातील अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे आमदारांना बोलून दाखवले. त्यामुळे येत्या काळात या रुग्णालयात अतिदक्षता विभागही सुरु करण्यात येईल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. मिरजगावमध्ये होणाऱ्या या उपजिल्हा रुग्णालयाचा फायदा हा दोन जिल्हा परिषद गटांना होणार आहे.
*प्रतिक्रिया* –
आरोग्य या विषयावर आम्ही मनापासून काम करत आहोत. कर्जत जामखेडमधील दोन्ही मोठ्या रुग्णालयांचा दर्जा देखील आता सुधारला आहे. त्याचबरोबर मिरजगाव या भागातील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आपल्या सरकारने मंजूर केली. त्यामुळे मी संबंधित विभागाचे मंत्री व सरकारचे आभार मानतो. तसेच यापुढेही आरोग्यावर लोकांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.  – *आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here