जामखेड न्युज – – –
गेल्या काही दिवसांपूर्वी आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या परिसरात एकूण १२ मानवी कवट्या आणि ५४ हाडे आढळली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर आता नागपूर शहरातूनही एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैदानावरील कचऱ्यात सहा भ्रूण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जमिनीत पुरलेल्या भ्रूणांचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. टेलिफोन एक्स्चेंज चौक ते अनिल हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर हे मैदान असून बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
काही वर्षांपासून या परिसरात असणारे मनपाचे देवडिया रुग्णालय बंद आहे. या रुग्णालयाच्या भिंतीच्या बाजूला परिसरातील नागरिक कचरा टाकतात. या परिसरातील रहिवासी व्यंकटेश नायडू आणि सुमित पडोळे हे दोघे दुपारी या कचऱ्याच्या ढिगाजवळ लघुशंकेसाठी गेले होते. यावेळी त्यांना प्लास्टिकच्या एका पिशवीत काही भ्रूण दिसले. लागलीच, लकडगंज पोलिसांना याविषयी कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जागा सील केली. काहीच वेळात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित आणि झोन क्रमांक पाचचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने हेही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी न्यायवैद्यकशास्त्राच्या चमूला घटनास्थळी पाचारण केले. जवळच्या एका खासगी रुग्णालयातील काही डॉक्टरांनाही बोलाविण्यात आले. या डॉक्टरांनी न्यायवैद्यक शास्त्राच्या चमूला भ्रूण गोळा करण्यात शास्त्रीयदृष्ट्या मदत केली. त्या प्लास्टिकच्या पिशवीत सहा भ्रूण, एक हाड आणि एक मूत्रपिंड सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.