जामखेड न्युज – – –
गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी एसटीच्या विलिनीकरणासाठी संपावर आहेत. मात्र त्यावर अजूनही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता यावर तोडगा काढण्यासाटी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी याबाबत राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. या समितीत मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सभागृहातील सदस्यांचा समावेश असणार आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना एसटी संपाबाबत समिती नेमण्याची सूचना केली आहे. तर याबाबत आपण चर्चेसाठी समिती स्थापन करण्यास तयार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता लवकरच या संपावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडं एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. मात्र अजूनही या संपावर काही तोडगा निघाला नाही. अगदी दोन दिवसांपूर्वी एसटी विलिनीकरणाबाबतचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर तो विधानसभेमध्ये पटलावर ठेवण्यात आला होता.
यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही असे या अहवालामध्ये म्हटले होते. पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही विलिनिकरणाची मागणी लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, “राज्यातील विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत हा प्रश्न निर्माण झाला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये किती हाल झाले ते आपण पाहिले आहेत. या प्रश्नावर सरकारने आणि विरोधी पक्षनेत्यांनी दोन्ही सभागृहांची एक समिती तयार करुन त्याच्यासोबत चर्चा करा आणि हा प्रश्न मार्गी लावा.”