आधी मोदींच्या वक्तव्याचा निषेध मग लगीन

0
213
जामखेड न्युज – – – – 
“आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे” हे तानाजी मालुसरे (Tanaji malusare) यांचे वाक्य आपण इतिहासात वाचले आहे. मात्र याउलट एक प्रकार बुलडाण्यात पाहायला मिळालाय. जिल्ह्यातील एका नवरदेवाने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या वक्तव्याचा उपविभागीय कार्यालयात वऱ्हाडासह जाऊन निषेध नोंदवलाय, आणि नंतर हा नवरदेव बोहल्यावर चढलाय. बजेटच्या अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) विविध आरोप केलेत, त्याचबरोबर महाराष्ट्राचा देखील त्यांनी अवमान केलाय. असा आरोप काँग्रेसने करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
मोदींच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र निदर्शने आणि निवेदन देण्याची माहिती मिळताच, या काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विजय बोंबटकार हा नवरदेव चक्क लग्नमंडपात जाण्याऐवजी आधी आपल्या वऱ्हाडासह आणि नवरदेवाच्या पोषाखात उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नंतर तो आसलगाव येथे जाऊन बोहल्यावर चढला. आपण विविध प्रकारची आंदोलनं पाहिली आहेत. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात तरी नवरदेवाने आंदोलनात पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या प्रकाराची जिल्हाभर चर्चा होत आहे.
मोदी काय म्हणाले होते?
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसने केले. काँग्रेसने युपी आणि बिहारींनी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाऊनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशनबाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. काँग्रेसच्या डीएनएमध्येच फुटीरतावादी मानसिकता आहे. तमिळ समाजाची भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. इंग्रज निघून गेले पण फोडा आणि राज्य कराची मानसिकता  काँग्रेसनं टिकवून ठेवली. काँग्रेस ही टुकडे-टुकडे गँगची लीडर आहे, असा घणागात मोदींनी केला होता. त्याविरोधात काँग्रेस आता आक्रमक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here