जामखेड न्युज – – – –
भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर पंतप्रधान मोदींनी जे स्वप्न पाहिले होते ती बुलेट ट्रेन आहे तरी कुठे, असा प्रश्न पडावा अशी सध्या स्थिती आहे. मुंबई ते अहमदाबाद अशी ही रेल्वे धावणार होती. या विषयावर ना सत्ताधारी काही बोलतात, ना विरोधक काही बोलतात. बुलेट ट्रेनच्या कामाची आजची स्थिती काय ? आणि बुलेट ट्रेन हे स्वप्न राहणार की कधीतरी वास्तवातही येणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्याचा एका वाक्यातील अर्थ असा आहे, की बुलेट ट्रेनचे गुजराथमधील काम जोरात सुरु आहे, मात्र महाराष्ट्रात मात्र ही बुलेट ट्रेन प्रचंड लेट आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार गुजराथमधील वापी, बिलीमोरा, सुरत आणि भरूच या स्थानकांवर कामाला वेग आला आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत ही चारही स्थानके तयार होतील, त्यापैकी सुरत सर्वात आधी तयार होईल.
२०२६ मध्ये भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरत ते बिलीमोरा हे ५० किमी अंतर धावेल. गुजराथमधील ही स्थिती असली तरी महाराष्ट्रात अजुन भुसंपादनाच्या स्टेजवरच गाडी अडकली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, दादरा व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश व गुजराथ या तीन राज्यातून भुसंपादन करावे लागणार होते. त्यापैकीं गुजराथमधून ९८.६१ टक्के तर दादरा,नगर हवेलीतून १०० टक्के भुसंपादन झालेले आहे. मात्र महाराष्ट्रातील फक्त ५६.३९ टक्केच जमिन संपादित होऊ शकलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कामच वेग घेत नाही आहे.
२०१७ मध्ये उद्घाटन झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पुर्ण व्हायचे होते. मात्र कोरोना संकटामुळे आता प्रकल्पाला आणखी काही वर्षे उशीर होणार आहे. ५०८ किमी लांबीची या मार्गावरून प्रत्यक्षात बुलेट ट्रेन धावताना पाहण्यासाठी अजून चार वर्षे तरी वाट पहावी लागणार आहे.





