पुन्हा येणार थंडीची लाट, पारा आणखी खाली घसरणार; हवामान विभागाचा इशारा

0
235
 जामखेड न्युज – – – 
राज्यात सध्या थंडीचा कडाका जास्त आहे. तापमान कमी जास्त होत असलं तरी थंडी मात्र कायम आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तर २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलामुळे राज्यावर धूळ, धुक्याचे मळभ
हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झालं होतं. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली, तर सौराष्ट्राकडून धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतल्या अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here