एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालक नियुक्त

0
249
जामखेड न्युज – – – – – 
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे. त्यानुसार रविवारपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालक नियुक्त होत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. सुमारे तीन हजारांपर्यंत कंत्राटी चालक भरती करण्याचा विचार महामंडळाचा आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला संप अद्यापही मिटलेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.
                      ADVERTISEMENT
महामंडळाने एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. हे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदारांकडून अर्जही मागविले. त्यानुसार महामंडळाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर चार कंत्राटदारांना राज्यातील एसटीच्या आठ विभागांत चालक पुरवण्याचे कामही सोपविले आहे. नागपूर, भंडारा, धुळे, जळगाव, नाशिक, ओैरंगाबाद, पुणे, सोलापूर या आठ विभागांत ४०० खासगी चालक नियुक्त केले जातील, अशी माहिती देण्यात आली. ९ जानेवारीपासूनच हे चालक नियुक्त करावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून कंत्राटदारांना करण्यात आल्या आहेत.
पुरवठा करण्यासाठी खासगी संस्थांनाही अटी व शर्ती घातल्या आहेत. भरती केले जाणारे मनुष्यबळ हे चालक करार पद्धतीने आहेत. अवजड वाहन चालवण्याचा परवाना घेऊन किमान एक वर्ष पूर्ण असणे, अवजड वाहन अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुवभ आवश्यक असणे यासह अन्य काही अटी नमूद आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २८५ अर्ज
सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त चालकांनाही एसटी महामडंळाकडे चालक करार पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यासाठीही तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत २८५ अर्ज महामंडळाकडे प्राप्त झाले आहेत. चालकाकडे अवजड वाहन परवाना, वय ६२ वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक पाहिजे, अशा अटींसह नोकरीत घेतले जाणार आहे. या सेवानिवृत्त चालकांना एसटीत करारपद्धतीने २० हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. खासगी चालकांचे मनुष्यबळ पुरवण्याचे काम चार कंत्राटदारांना दिले आहे. त्यांच्याकडून प्रथम ४०० चालक देण्यात येत आहेत. त्यांचे काम आणि पुरवलेल्या मागणीची माहिती घेऊन आणखी कंत्राटी चालक भरती केले जातील. – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here