जामखेड न्युज – – – –
राज्यात दिवाळीपासून काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. पगारात घसघशीत वाढ करून सुद्धा काही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने महामंडळाने कारवाईचे हत्यार उपसले आहे. आतापर्यंत जवळपास 1 हजार 144 कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आलं असून निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 11 हजारांच्या वर आहे. आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य सरकार संप मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप काही एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, यातच एसटी महामंडळाने नव्याने कर्मचाऱ्यांनी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने नवी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
एसटी संप मिटत नसल्याने एसटीमध्ये सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्याबद्दल एसटी महामंडळाने जाहिरात काढली आहे. एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांनी जवळ पास दोन महिने संप पुकारला आहे. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यातल्या आगारातील बस अद्यापही धूळ खात पडून आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे या धुळखात पडलेल्या बस पुन्हा रस्त्यावर उतरवण्यासाठी शासनाला अतिरिक्त खर्चाची तजवीज करावी लागणार आहे.
दुसरीकडे या लालपरी रस्त्यावर धावत नसल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना खासगी वाहनांना प्रवास करावा लागत आहे. त्यातच खासगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकरत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना या एसटी बस संपाचा सर्वाधिक मोठा फटका बसत आहे. लालपरी थांबण्याचा सर्वाधिक परिणाम हा मुलींच्या शिक्षणावर पडल्याचे दिसून येत आहे.