जामखेड प्रतिनिधी
ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती,कर्जत-जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन,कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कांदा लसून संशोधन केंद्र राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन व सहकार्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नुकताच आयोजित करण्यात आला.
कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलावे यासाठी आ. रोहित पवारांचे सुक्ष्म नियोजन सुरू आहे.याचाच भाग म्हणुन राजगुरूनगर येथील कांदा- लसुण संशोधन केंद्रावर कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांची कांदा दिंडी काढण्यात आली होती.कांदा लसुण संशोधन केंद्राचा दौरा केल्यानंतर या दिंडीने बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह कांदा उत्पादकांच्या प्रक्षेत्रावर पाहणी व अभ्यास दौरा केला.
कांदा पिकविषयक मार्गर्शन देण्यासाठी राजगुरुनगर येथील कांदा लसुण संशोधन केंद्राचे डॉ. काळे यांनी कांदा पिकाचे नवीन वाण, हंगामानुसार वाण, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन,रोग व किड नियंत्रण, निर्यात योग्य वाण व साठवणूक पद्धती या विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रक्षेत्रावरील कांदा पिकाचे प्रात्यक्षिके व साठवणूक पद्धतीची पाहणी करण्यात आली.या कांदा दिंडीत कर्जत व जामखेड तालुक्यातील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.