शेवगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी घेणार जलसमाधी!!

0
252
जामखेड न्युज – – – 
 शेवगाव तालुक्यातसह महाराष्ट्र मध्ये संबंध शेतकऱ्यांचे विज कनेक्शन महामंडळाकडून वीज तोड करण्यात आलेली आहे, अनेक आंदोलने होऊन देखील कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय किसान सभा,स्वाभिमानी शेतकरी संघटना,यांनी विज महामंडळाचे विरोधात जलसमाधी आंदोलन करण्याचे ठरवलेले असताना, काल दुपारी तीन वाजता शेवगाव तहसील कार्यालयामध्ये शेवगावचे यांच्या मार्गदर्शनाखाली बोलावलेली शेतकरी शेतकरी नेते व प्रशासनातील अधिकारी यांची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी शेवगाव तालुक्यातील ढोरा नदीवरील पुलावरून शेकडो शेतकरी कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करतील असे जाहीर करण्यात आले. याबाबत शेवगाव तहसील, महावितरण आणि पोलिसांना निवेदने देण्यात आली आहेत.
यावेळी शेतकरी नेत्यांनी कोणत्याही प्रकारचे थकबाकी न देता ताबडतोब चालू करावी व त्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात येईल अशी भूमिका ठेवली तर वीज वितरणचे अधिकारी यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणामुळे आजचीही तहसील कार्यालयात बनवलेली महत्वपूर्ण बैठक निष्फळ ठरली आहे असे भारतीय किसान सभेचे संजय नांगरे यांनी सांगत जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन होणार असल्याचेही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी सांगितले. राज्य सरकार निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या बीजबिल माफीचे आश्वासन देते, शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आश्वासन देणाऱ्यांना मते दिली. प्रत्येक्षात आता वीज वितरण पंधरा-वीस दिवसांपासून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे जुलमी पद्धतीने वीज पंप कनेक्शन तोडत आहेत. यावर विविध संघटनांनी ढोरा नदीवरील पुलावर जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला, त्यावर तोडगा काढू म्हणून शेवगाव तहसीलदार आणि वीज वितरण अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली. मात्र प्रशासनाने कोणताही दिलासा शेतकऱ्यांना दिला नाही. बिले भरा या भूमिकेवर प्रशासन ठाम राहिल्याने आता विविध संघटनांचे शेतकरी कार्यकर्ते हे जलसमाधी आंदोलनावर ठाम आहेत, शेकडोच्या संख्येने 9 डिसेंबर रोजी दुपारी शेतकरी कार्यकर्ते ढोरा नदीवरील पुलावरून जलसमाधी घेतील, याचे जे काही दुष्परिणाम होतील त्यास प्रशासन,महावितरण जबादार राहिला असा इशारा दत्तात्रय फुंदे यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष भाऊ बैरागी यांनी शेतकरी जर डीपी व तारी चे मेंटेनेस खर्च स्वतः करत असेल व त्या वेळी वीज महामंडळाकडून कोणतीही आर्थिक मदत शेतकऱ्यांना होत नसेल तर केला गेलेला मेंटेनन्स खर्च हा शेतकऱ्यांच्या खिशातून जात असल्यामुळे शेतकरी आजमीतिला प्रशासनाच्या कोणतेही हाकेला साद न घालता केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे जलसमाधी आंदोलनावर  ठाम असल्याचे सांगितले.
यावेळी पूरग्रस्त शेतकरी दिलीप लबडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या उर्मट वागणुकीबद्दल निषेध व्यक्त केला. कोरोना, अतिवृष्टीने ग्रामीण भाग कोसळला आहे. खरीप वाया गेला आता रब्बीतही अतिवृष्टी झाली, मात्र जे काही पिके तगली आहेत ती जगवून शेतकरी जगण्याचा प्रयत्न करत असताना आर्थिक संकटात आलेल्या बळीराजाची वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता तोडली गेली आहेत. पाणी असून आज शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आता जलसमाधी शिवाय पर्याय नाही असे लबडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here