आदर्शवत विवाह!! करोनामुळं पती गमावलेल्या महिलेशी विवाह करून दिला आयुष्यभराचा आधार

0
366
जामखेड न्युज – – – 
करोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवांना सरकारने मदत करावी, यासाठी विविध संघटना कार्य करीत आहेत. सरकारकडून काही योजनाही जाहीर होत आहेत. मात्र, राहुरी (Rahuri) तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका तरुणाने त्याही पुढे जात आदर्शवत काम केले आहे. नऊ महिन्यांचे बाळ असलेल्या एका विधवा महिलेशी या अविवाहित युवकाने लग्न करून तिला आयुष्यभराचा आधार दिला आहे. किशोर राजेंद्र ढुस असे त्याचे नाव आहे. त्याचे परिसरात कौतुक होत आहे. राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्थेने या जोडप्याला भरीव मदतही केली आहे.
या भागातील एका महिलेच्या पतीचे करोनामुळे निधन झाले. त्यांना नऊ महिन्यांचे बाळ आहे. ऐन तारुण्यात अचानक संकट कोसळलेल्या या माहिलेच्या मदतीसाठी देवळाली प्रवरा येथील किशोर ढुस हा अविवाहित तरुण धावून आला. त्या महिलेशी लग्न करून बाळासह त्यांच्या स्वीकार करण्याची तयारी त्याने दर्शविली. दोन्ही बाजूंनी समंती मिळाल्यावर विवाह पार पडला. राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख, राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्था व देवळाली प्रवरा हेल्थ टीम यांनी यासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी ढुस दाम्पत्याचा सत्कार केला. त्यांना कपडे व वस्तू भेट देण्यात आल्या. विशेष म्हणजे संस्थेतर्फे त्यांच्या बाळाच्या नावावर अकरा हजार रुपयांची मुदत ठेव ठेवत त्याची पावती त्यांना देण्यात आली. तहसिलदार शेख, रामभाऊ काळे, कमल काळे, दत्ता कडू, करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसिलदार शेख म्हणाले, ‘करोनाने प्रत्येकाला दुःख दिले. तारुण्यात पती गमावल्याचे दुःख असहाय्य आहे. मात्र किशोर ढुस यांनी या महिलेशी विवाह करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. सरकार आपल्या परीने मदत करीत आहेच, मात्र किशोर ढुस यांनी जे धाडस केले ते कौतुकास्पद आहे. नऊ महिन्यांचे बाळ असलेल्या महिलेशी विवाह करून तिला जगण्याची नवीन उमेद दिली. हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here